हैदराबाद Ramoji Rao Last Rites At Smruthi Vanam : भारतीय पत्रकारिता, चित्रपट उद्योगातील उत्तंगु व्यक्तिमत्त्व आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रामोजी फिल्म सिटीमध्ये बांधलेल्या 'स्मृती वनम'मध्ये सर्व विधींसह त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रामोजी राव यांचे कुटुंबीय, आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री तथा टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि अनेक बडे नेते उपस्थित होते.
रामोजी राव यांची माध्यमसम्राट अशी ओळख : रामोजी राव यांनी ईनाडू, ईटीव्हीमधील पत्रकारितेचा वापर जनहितासाठी केला. फिल्म आणि मीडिया क्षेत्रात क्रांती घडवणारे रामोजी राव अनंतात विलीन झाले. रामोजी राव यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, चाहते आणि रामोजी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत भावूक मनानं अखेरचा निरोप दिला. रामोजी राव यांचे पार्थिव शनिवारी दिवसभर दर्शनासाठी रामोजी फिल्म सिटी येथील कॉर्पोरेट कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आलं. कुटुंबीयांनी घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर तेलंगाणा सरकारच्यावतीनं पोलिसांनी मानवंदना दिली. रामोजी रावांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वैकुंठ रथावरून नेण्यात आलं. कुटुंबातील सदस्यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवावर फुले आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. रामोजी राव यांचं पार्थिव घराबाहेर आणल्यावर कुटुंबीय भावूक झाले होते.
चंद्राबाबू नायडू यांनी पार्थिवाला दिला खांदा : रामोजी राव यांच्या अंत्ययात्रेत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना, तेलंगाणाचे मंत्री तुम्मलंगेश्वर राव, बीआरएसचे दिग्गज नेते, तेलुगू देसम पक्षाचे अनेक नेते आणि अनेक माजी मंत्री सहभागी झाले. स्मृती वनम येथे अखेरचा निरोप घेताना कुटुंबीय आणि ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मुरली मोहन यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रामोजी राव यांची अंत्ययात्रा ही ईटीव्ही भारत, ईटीव्ही, ईनाडू या कार्यालयासमोरून जाताना अनेक कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. रामोजी राव यांच्या घरापासून ते स्मृती वनमपर्यंतचा शेवटचा प्रवास सुमारे चार किलोमीटरचा होता. रामोजी राव यांनी कठीण काळात साथ दिलेले तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनीही रामोजी राव यांच्या पार्थिवाला खांदा दिला. रामोजी राव यांचे मोठे चिरंजीव किरण यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार केले.
फिल्म आणि मीडिया क्षेत्रात क्रांती घडवली : रामोजी राव यांनी रामोजी फिल्म, ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराला चालना दिली. त्यांच्या मृत्यूनंतर कला, राजकारणासह माध्यम क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या आदेशानुसार रंगारेड्डीचे जिल्हाधिकारी आणि सायबराबादचे आयुक्त यांनी व्यवस्थेची देखरेख केली. आंध्र प्रदेश सरकारनं दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला.
पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान : रामोजी राव हे भारतीय माध्यम आणि चित्रपट उद्योगात अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील पेडापरुपुडी येथील शेतकरी कुटुंबात झाला होता. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलं. मार्गदर्शी चिट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलांजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स या कंपन्यांनी चांगलं नाव कमावलं. रामोजी राव यांना तेलुगू चित्रपट आणि मीडियामधील योगदानासाठी पद्मविभूषण (2016) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी भारतात : चित्रपट शूटिंगकरता देशातच चांगला पर्याय उपलब्ध करून देणारी फिल्म सिटी रामोजी राव यंनी 1996 मध्ये निर्माण केली. 1,666 एकरमध्ये पसरलेली या रामोजी फिल्म सिटीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. केवळ पर्यटकच नाही तर चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, अनेक सेलिब्रिटींना या फिल्म सिटीचे आकर्षण आहे. कारण, फिल्म सिटीमध्ये चित्रपट निर्मितीसाठी लागणारे भव्य सेट तयार करण्यासाठी सुविधा, तंत्रज्ञान आणि फिल्म सेट आहेत. त्याचबरोबर हॉटेलमधून देण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत.
रामोजींच्या कार्यामुळे मिळत राहणार प्रेरणा : रामोजी राव हे उद्योजकतेबरोबर सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रमांना मदत केली. त्यांनी अनेकांचे जीवन बदलून टाकले. रामोजी राव यांनी गुणग्राहकता दाखवून अनेक पत्रकारांना संधी देऊन घडवलं. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशाच्या कला क्षेत्रासह माध्यम क्षेत्राला चालना मिळाली. त्यांनी दूरदृष्टीनं सुरू केलेल्या विविध उद्योगांनी उत्तम सेवा आणि दर्जाचे नवीन मापदंड निश्चित केले. त्यांनी विविध क्षेत्रात उमटवलेला ठसा कायम राहणार आहे. त्यांचे कार्य भविष्यातील पिढ्यांना सतत प्रेरित करणार आहे.
हेही वाचा-
- कोल्हापूरशी जुळली होती रामोजी रावांची नाळ; 90 च्या दशकात ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओला दिली होती भेट - Ramoji Rao Passed Away
- फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away
- रामोजी राव यांच्या निधनानं 'फिल्मसिटी' झाली पोरकी! 'ईटीव्ही परिवारावर' दु:खाचा डोंगर; रामोजी फिल्मसिटीतून लाईव्ह - Ramoji Rao Passed Away