नवी दिल्ली Bharat Ratna 2024 : केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी 'X' वर पोस्ट करून ही माहिती दिली.
चौधरी चरण सिंह : आरएलडीचे (RLD) प्रमुख जयंत सिंह यांचे आजोबा आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची होती. चौधरी चरण सिंह यांची आठवण करून, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'X' अकाउंटवर पोस्ट केलं, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत येणं हे आमच्या सरकारचं भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेलं समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे."
नरसिंह राव : काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्ननं सन्मानित करण्यात येणार आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर असताना भारताची उत्कृष्ट सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचं दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरलं."
एमएस स्वामीनाथन : प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचं स्मरण करून पंतप्रधान मोदींनी लिहिलं की, "भारत सरकारनं डॉ. एमएस स्वामीनाथन यांना आपल्या देशातील कृषी आणि शेतकरी कल्याणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतरत्न देऊन सन्मानित केलं आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले."
हे वाचलंत का :