जयपूर (राजस्थान) : PM Modi VC in Jaipur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूरमध्ये रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पिण्याचं पाणी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित 17 हजार कोटी रुपयांहून अधिकच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच, जेईसीसी सीतापुरा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या सरकारवर जोरदार टीका केली. 'आज भारत अर्थव्यवस्थेत प्रगती करत असताना काँग्रेसला तेही पचवता येत नाही. त्यांना फक्त मोदींविरोधात बोलायचं आहे. आज देशात विकासाची चर्चा होत आहे, पण 10 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर घोटाळे आणि बॉम्बस्फोटांची चर्चा होती अशी टीका मोदींनी यावेळी केली.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींचं स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच राजस्थान आणि विशेषतः जयपूरच्या लोकांचं स्वागत केलं. मोदी म्हणाले की, अलीकडेच जयपूरच्या लोकांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचं भव्य स्वागत केलं. या स्वागताची जगभरात चर्चा झाली. त्याबद्दल शहरवासीयांचे आभारही मोदींनी मानले. जेव्हा राजस्थानचे लोक पाहुणचार करतात त्यावेळी कोणतीही कसर सोडत नाहीत असंही मोदी म्हणाले. तसंच, येथील जनतेने मोदींच्या हमीवर विश्वास ठेवला. राजस्थानच्या जनतेने दुहेरी इंजिनचं सरकार स्थापन केलं. या दुहेरी इंजिन सरकारने वेगाने काम सुरू केलं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.
घोटाळे आणि बॉम्बस्फोटांची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 2014 पूर्वी देशात फक्त घोटाळे आणि बॉम्बस्फोटांचीच चर्चा होत होती. लोक भीतीने जगत होते. दिवस कसे घालवायचे याचा विचार लोक करत असत. पण आज आपण मोठी स्वप्ने पाहतो आहोत. मोठे संकल्प पूर्ण करत आहोत. आज देश विकसित भारताबद्दल बोलतो. ही केवळ शब्द आणि भावना नसून प्रत्येक कुटुंबाचं जीवन समृद्ध करण्याची मोहीम आहे. गरिबी मुळापासून नष्ट करण्याची ही मोहीम आहे. असंही ते यावेळी म्हणाले. आज जगभरात भारताच्या विकासाची चर्चा होत आहे. विकसित भारतासाठी रेल्वे, वीज आणि पाणी यासारख्या सुविधांचा जलद विकास आवश्यक आहे. पायाभूत सुविधांमुळे उद्योग आणि अधिकाधिक नोकऱ्या येतील. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रुपये ठेवण्यात आल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.
आज पूर्णपणे परिस्थिती बदलली : पंतप्रधान म्हणाले, की काँग्रेसची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांनी दूरदृष्टी आणि विचाराने सकारात्मक धोरणे आखली नाहीत. भविष्यातील विकासाचा कोणताही रोड मॅप काँग्रेसकडे नव्हता. या विचारसरणीमुळे भारताची जगात बदनामी झाली असा आरोपच मोदींनी यावेळी केला. तसंच, काँग्रेसच्या काळात करोडो घरात वीज नव्हती. आमच्या सरकारने धोरणे बनवली आणि निर्णय घेतले. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :
1 बँक खाती गोठवल्याप्रकरणी काँग्रेसचा थयथयाट; कोर्टात मिळाला दिलासा, बुधवारपर्यंत मुदतवाढ
3 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना