हैदराबाद : 'पीएम किसान सन्मान निधी' योजना आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' या योजनांचे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 ला सकाळी 11 वाजता वाशिम येथील समारंभात वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
योजनेचा 18 वा हप्ता होणार जारी : 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून 9.26 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 17 वा हप्ता जारी केला होता. केंद्र सरकारनं जारी केलेल्या या योजनेचा 18 वा हप्ता DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला जमा केला जाणार आहे.
5 ऑक्टोबर येणार 18 वा हप्ता : केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून शेतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा खर्च भागवण्यास मदत केली जाते. 2024-2025 या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केला जाणार आहे.
'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'चे फायदे : 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची रक्कम एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ही योजना 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली होती.
शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक : या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची 'ई-केवायसी' पूर्ण करावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार आणि पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. 'पीएम किसान पोर्टल'वर ओटीपी आधारित ई-केवायसी करण्याची सोय उपलब्ध आहे.
हेही वाचा -