नवी दिल्ली Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यातच आता दिलासादायक बातमी समोर आलीय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन रुपयांनी कमी झाल्या आहेत. ही रक्कम जरी जास्त नसली तरी यामुळं वाहन धारकांना नक्कीच थोडाफार दिलासा मिळणार आहे.
शुक्रवारपासून नवे दर लागू : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा केलीय. पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाल्यानं हा सामान्य नागरिक आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मानला जात आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.
हरदीप सिंह पुरी यांनी दिली माहिती : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी 'एक्स'वरुन याबाबतची घोषणा केलीय. "पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दोन रुपयांची कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, कोट्यवधी भारतीयांचं हित जपणं हे लक्ष्य आहे," अशी पोस्ट हरदीप सिंह पुरी यांनी शेयर केलीय. गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्यानं केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी ओलांडल्याने त्याची बरीच चर्चा झाली. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकाही केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दोन रुपयांची कपात केलीय.
विरोधकांची मोदी सरकारवर टीका : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दोन रुपयांची कपात करण्यात आलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केलीय. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपानं ही घोषणा केलीय. आतापर्यंत कोणतेही चांगले निर्णय घेतले नाहीत. आताच निवडणुकांच्या तोंडावर भाजपानं निर्णयांचा सपाटा लावल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.
हेही वाचा -