लखनौ: राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. ही विद्यार्थिनी आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आहे. शनिवारी रात्री वसतिगृहाच्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनिका रस्तोगी असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बीए एलएलबी (ऑनर्स) तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
अनिका रस्तोगीनं शनिवारी संध्याकाळी इतर विद्यार्थ्यांसह समुपदेशनात भाग घेतला होता. रात्री जेवण करून ती तिच्या हॉस्टेलच्या खोलीत गेली. रात्री दहाच्या सुमारास तिची रुममेट खोलीजवळ पोहोचली. अनिकाला आवाज देऊन आणि बराच वेळ दार ठोठावूनही तिनं दरवाजा उघडला नाही. मोठ्या प्रयत्नानंतर खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा रुममेटला अनिका जमिनीवर पडल्याचं दिसून आलं. तिला उपचाराकरिता तातडीनं अपोलो मेडिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी अनिका रस्तोगीला मृत घोषित केले.
- एडीसीपी पूर्व पंकज सिंह यांनी सांगितले, " नोएडातील एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत."
हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचा दावा- स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिका रस्तोगीचे वडील 1998 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत. ते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) कार्यरत आहेत. विद्यापीठानं निवदेनात म्हटलं की, "आम्ही अत्यंत दु:खानं जाहीर करत आहोत की, अनिका रस्तोगी या बीए एलएलबी (ऑनर्स) तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीचं शनिवारी रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं."
कोण आहेत रस्तोगी? संतोष रस्तोगी हे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईत सहआयुक्त (गुन्हे), नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त निवासी आयुक्त अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच त्यांनी मुंबईत सह पोलीस आयुक्त (प्रशासन) म्हणूनदेखील काम केले आहे. सीबीआयचे अधिकारी म्हणून रस्तोगी यांनी टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याच्या तपासाचं कामदेखील केलं आहे.