झालावाड (राजस्थान) Murder In Jhalawar : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पगारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कौटुंबिक वादानं मोठ्या वादाचं रुप धारण केलंय. आपापसातील वादानंतर पगारिया पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांना डंपरनं चिरडून त्यांचा खून करण्यात आलाय. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. ही घटना पगारिया पोलीस स्टेशन हद्दीतील बिनयागा गावातली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ऐन होळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यानं राजस्थानात एकच खळबळ उडालीय.
दोन सख्ख्या भावांसह पाच जणांची हत्या : या घटनेची माहिती देताना भवानीमंडीचे डीएसपी प्रेम चौधरी यांनी सांगितलं की, "रात्री उशिरा पगारिया पोलीस स्टेशन हद्दीतील बिनयागा गावात काही कारणावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. यात दोन सख्ख्या भावांसह एकाच गटातील पाच जणांना डंपरनं चिरडून ठार केल्याचं सांगण्यात आलं. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. आपापसात वाद झाल्यानंतर हे पाच जण पगारिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार होते. यावेळी काही लोकांनी त्यांना डंपरनं धडक दिली. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय."
राज्याबाहेरही आरोपींचा शोध : या घटनेनंतर राज्याच्या सीमावर्ती भागातून आरोपी पळून गेल्याची माहिती मिळालीय. त्यानंतर अनेक पोलीस पथकं राजस्थानला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यात पाठवण्यात आली आहेत. सध्या पाच जणांचे मृतदेह शासकीय आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. पगारिया, दाग, मिश्रोली पोलिसांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिरंजी लाल मीणा यांच्यासह पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
हेही वाचा :
- Badaun Childrens Murder: आरोपीनं दोन चिमुकल्यांचा खून का केला, वाचा बदायू खून प्रकरणाची 'इनसाईड स्टोरी'
- Husband Murder Case : पत्नीनं सैन्यदलातील प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट; पत्नी, प्रियकरासह साथीदाराला अटक
- Mumbai Murder News: दागिने शोरुम मालकाच्या पत्नीची घरातील नोकराकडून हत्या, बिहारला पळून जाताना रेल्वे स्थानकातून अटक