बंगळुरू : कर्नाटक राज्यात माता मृत्यूनं मोठी खळबळ उडाली आहे. मागील पाच वर्षाच्या कालखंडात कर्नाटक राज्यात तब्बल 3 हजार 364 माता मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यामुळे गरोदर महिलांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयानं मागील पाच वर्षात झालेल्या माता मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार 2019-20 ते नोव्हेंबर 2024 ते 25 या कालावधीत एकूण 3 हजार 364 मातांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
पाच वर्षात 3 हजारावर माता मृत्यू : कर्नाटक सरकारनं माता मृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कर्नाटक सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात 3 हजार 364 माता मृत्यू झाले आहेत. बल्लारीतील माता मृत्यू प्रकरणानंही मोठी खळबळ उडाली. सरकारनं माता मृत्यू रोकण्याकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला असून सभागृहात आणि सभागृहाबाहेर निदर्शनं सुरू केली आहेत. विरोधकांनी आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. बेळगावी जिल्ह्यात 300 हून अधिक माता मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. या संदर्भात विरोधी पक्षनेते आर अशोक आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी बिम्सला भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे माता मृत्यूला राजकीय वळण लागलं आहे. कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. त्यामुळे विरोधकांनी माता मृत्यूवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
माता मृत्यूवरुन तापलं कर्नाटकचं राजकारण : माता मृत्यू रोखण्यासठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. माता मृत्यू रोखण्यासाठी विरोधी पक्षातील नेते सरसावले आहेत. मात्र माता मृत्यू भाजपा सरकारच्या काळातही झाले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं मागील पाच वर्षांत राज्यातील माता मृत्यूची आकडेवारी उपलब्ध करून दिली. या आकडेवारीत भाजपाच्या काळातही मातामृत्यू वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे, असा हल्लाबोल सत्ताधारी करत आहेत.
आतापर्यंत झालेल्या माता मृत्यूंची आकडेवारी :
2019-20 मध्ये एकूण 662 माता मृत्यू
2020-21 मध्ये 714 माता मृत्यू
2021-22 मध्ये 595
2022-23 मध्ये 527
2023-24 मध्ये 518
नोव्हेंबर 2024-25 पर्यंत 348
हेही वाचा :
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला सुनावलं; "मराठी भाषिकांसोबत..."
- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तापला; पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्यांना ठेवलं नजरकैदेत, सीमाभागात तणाव
- सावरकरांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर कर्नाटकचे मंत्री म्हणाले," कट्टरवादाचा खरा मुकाबला म्हणजे..." - Savarkar Vs Gandhi