त्रिवेंद्रम Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड इथून बुधवारी लोकसभा निवडणूक 2024 चा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांनी 'घर घर गॅरंटी' योजनेची कार्ड मतदारांना वाटप केली. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यात राहुल गांधी यांनी आपली एकूण संपत्ती 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं.
राहुल गांधी यांची संपत्ती 20 कोटींपेक्षा जास्त : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली संपत्ती उमेदवारी अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात जाहीर केली. यात राहुल गांधी यांनी त्यांच्याकडं 9 कोटी 24 लाख 59 हजार 264 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं जाहीर केलं. तर 11 कोटी 15 लाख 2 हजार 598 रुपये स्थावर मालमत्ता जाहीर केली. राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली एकूण मालमत्ता 20 कोटी 39 लाख 61 हजार 862 रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.
काय आहे राहुल गांधी यांच्या उत्पन्नांचा स्त्रोत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी भरताना आपल्या उत्पन्नांचा स्त्रोत काय आहे, याबाबतची माहिती प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. राहुल गांधी यांच्या उत्पन्नांचा स्त्रोत खासदारांना मिळणारा पगार आहे. यासह त्यांना रॉयल्टी, भाडे, व्याज, बाँड, लाभांश आणि म्युच्युअल फंडातून भांडवली नफा मिळत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
राहुल गांधींच्या नावावर सहमालकीचे दोन भूखंड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केवळ 20 कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यासह त्यांच्या नावावर बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांच्या सहमालकीची दोन भूखंड असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. राहुल गांधी यांचं 2022 ते 2023 या वर्षातील एकूण उत्पन्न 1 कोटी 02 लाख 78 हजार 680 रुपये होतं, असंही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
काय आहे राहुल गांधी यांचं शिक्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाबाबत विरोधक नेहमीच आक्रमक होतात. त्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षणाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून असते. राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षणाबाबतची माहिती उमेदवारी अर्जासोबत जाहीर केली. यात काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांचं पदवीचं शिक्षण फ्लोरिडा इथल्या रोलिन्स महाविद्यालयातून 1994 ला पूर्ण केलं. तर केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांनी 1995 ला एम फिल पूर्ण केलं. राहुल गांधी यांनी वायनाड इथल्या कलपेट्टा परिसरात उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर बुधवारी रोड शो केला.
हेही वाचा :
- काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा मैदानात; वायनाडमध्ये 'इंडिया' आघाडीतच जोरदार टक्कर - Lok Sabha Election 2024
- काँग्रेस राबवणार घर घर गॅरंटी योजना : 8 कोटी घरांपर्यंत राबवणार डोअर टू डोअर ड्राईव्ह - Lok Sabha Election 2024
- Bharat Jodo Nyay Yatra : इंडिया आघाडीला होणार का राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा फायदा ? जाणून घ्या काय आहेत कारणं ?