चंदीगड : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं कारागृहात मुलाखत दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या या मुलाखतीमुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आता पंजाब सरकारनं कठोर कारवाई केल्याचं दिसून आलं. या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर सरकारनं मोठी कारवाई केली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कारागृहातील 7 पोलिसांवर कारवाई : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या मुलाखतीच्या प्रकरणानं देशभरात मोठी खळबळ उडाली. यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीनं चौकशी करुन कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. पंजाब राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव गुरकिरत कृपाल सिंग यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त ते हवालदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एसआयटीनं राजस्थान पोलिसांना दिले पुरावे : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या मुलाखत प्रकरणानं पंजाब पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी गृह विभागानं एसआयटीची स्थापना केली. एसआयटीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई या मुलाखतीसाठी मदत करणाऱ्या 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत तो जयपूर सेंट्रल जेलमध्ये असताना घेण्यात आली होती. याबाबतचे पुरावे एसआयटीनं राजस्थान पोलिसांना दिले. या प्रकरणी जयपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबच्या कारागृहात असताना त्याची मुलाखत घेण्यात आली, तपासात आढळून आलं. त्यामुळे पंजाब सरकारनं ही कारवाई केली आहे.
हेही वाचा :