रांची Hemant Soren Grants Bail : जमीन गैरव्यवहार प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती. या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे. हेमंत सोरेन यांना ईडीनं 31 जानेवारीला अटक केली. न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयानं त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. 13 जून रोजी हेमंत सोरेन यांचे वकील आणि अंमलबजावणी संचालनालयाचे एएसजी एस व्ही राजू यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. ईडीनं रांचीच्या बडगई भागात 8.86 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी 31 जानेवारीला हेमंत सोरेन यांना अटक केली. तेव्हापासून ते रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात बंद होते. आज दुपारी त्यांची सुटका करण्यात आली.
Jharkhand High Court grants bail to former Jharkhand Chief Minister Hemant Soren, in the land scam case. pic.twitter.com/xA1b2mfXvn
— ANI (@ANI) June 28, 2024
जमीन व्यवहरात केली होती अटक : जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचं असल्याचं न्यायालयात सांगितलं होतं. ही जमीन हस्तांतरित करता येणार नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणात मनी लाँड्रिंग झालेली नाही, असा दावा हेमंत सोरेन यांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. हेमंत सोरेन यांनी या जमिनीबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. मात्र ही जमीन ताब्यात घेण्यासाठी हेमंत सरेन यांनी अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप ईडीच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला.
जामीन देण्याला ईडीचा विरोध : ईडीनं आरोप केलेली जमीन हेमंत सोरेन यांची असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. याबाबत त्यांच्या पूर्व सल्लागारानंही ही जमीन त्यांची असल्याचं सांगितल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला. जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला महसूल कर्मचारी भानू प्रताप यानंही हे मान्य केल्याचा दावा ईडीनं न्यायालयात केला. इतकंच नाही तर त्या जागेवर बँक्वेट हॉल बांधण्याची हेमेत सोरेन यांची योजना होती. वास्तुविशारद विनोद सिंह यांनी हेमंत सोरेन यांच्या मोबाईलवर यासंबंधीचा नकाशाही पाठवल्याचा दावा ईडीनं केला. हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यास ते सरकारी यंत्रणेचा वापर करून तपासात अडथळा आणू शकतात, असं ईडीच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केलं. मात्र दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयानं हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला.
हेही वाचा :
- दोन मुख्यमंत्र्यांच्या जामिनाची न संपणारी कथा; केजरीवाल यांना जामीन, हेमंत सोरेनचं काय होणार ? - The Tale of Two Bails
- रांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल - ED filed charge sheet Hemant Soren
- "माझ्या अटकेमागे राजभवनाचा हात, अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती", हेमंत सोरेन यांचे गंभीर आरोप