रांची (झारखंड) : गेल्या अनेक दिवसांपासून कथित जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चर्चेत आहेत. त्यांना ईडीकडून अनेकदा समन्स बजावण्यात आलं. परंतु, हेमंत सोरेन उपस्थित राहिले नाहीत. मंगळवारी त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी ईडीने छापा टाकत एक बीएमडब्ल्यू काल आणि 35 लाख रोख रक्कम जप्त केली. दरम्यान, सोरेन तेथे नसल्यानं ईडीकडून ते गायब असल्याचंही सांगण्यात आलं. या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री सोरेन आज दुपारी 1 वाजता ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. यावेळी सोरेन यांना अटकही होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'झारखंड मुक्ती मोर्चा'च्या आमदारांची बैठक : ईडीनं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याची मागणी केंद्राकडे आधीच केली होती. दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मंगळवारी रस्तामार्गे रांचीला पोहचले. रांची येथे दाखल होताच सोरेन यांनी 'झारखंड मुक्ती मोर्चा'च्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला सोरेन यांच्या पत्नी कल्पनादेखील उपस्थित राहिल्यानं चर्चेचा विषय झाला. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होऊ शकतात : झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार रांची येथील सर्किट हाऊसमध्ये थांबलेले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटकही होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा जोरदार चर्चा आहेत. कल्पना सोरेन यांच्या नावाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. याचबरोबर हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. तर दुसरीकडे, भाजपकडून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे. तसंच, हेमंत सोरेन यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असा आरोपही भाजपाकडून केला जात आहे.
हेही वाचा :
2 हेमंत सोरेन ईडी चौकशी : ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार केली जप्त