जम्मू-काश्मीर Jammu Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठा अपघात झालाय. गुरुवारी जम्मू जिल्ह्यात यात्रेकरुंनी भरलेली बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत पडली. यात 15 जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितलं की, या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. चोकी चोरा येथील टांगली वळणावर हा अपघात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही बस सुमारे 150 फूट खाली खड्ड्यात कोसळली. ही बस हरियाणातील कुरुक्षेत्र भागातून शिव खोरी भागात यात्रेकरूंना घेऊन जात होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ : अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथकही घटनास्थळी पोहोचलं. पोलीस नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफनं तातडीनं बचावकार्य सुरु केलं. यातील जखमींना अखनूर येथील स्थानिक रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय.
40 जण जखमी : जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, भाविकांना घेऊन जाणारी बस (UP81 CT-4058) चौकी चौराजवळ तुंगी मोर इथं पोहोचली तेव्हा बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 40 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतदेह एसडी हॉस्पिटल अखनूरमध्ये ठेवण्यात आले आहेत, जखमींना जम्मू जीएमसीमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मोदींकडून शोक व्यक्त : जम्मूमध्ये झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी यावर शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले की, "अखनूर येथील बस दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्यानं मला दु:ख झालं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो." बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
हेही वाचा :