हैदराबाद : विविध क्षेत्रांमधील योगदानात 'रामोजी ग्रुप'चं नाव अग्रेसर आहे. पर्यटन, शैक्षणिक, फिल्म, फूड, गृह उद्योगासह अनेक क्षेत्रात ग्रुपनं पाय रोवलाय. संकटकाळातही 'रामोजी ग्रुप' खंबीरपणे उभा राहिल्याचं अनेकवेळा दिसून आलं. आता देशातील अग्रेसर शैक्षणिक संस्था असलेल्या 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' (ISB) या संस्थेला 'रामोजी फाउंडेशन'कडून 30 कोटींची देणगी देण्यात आली.
30 कोटींची देणगी : 'रामोजी फाउंडेशन'द्वारे त्यांच्या CSR फंडातून 30 कोटींची देणगी 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' (ISB) या संस्थेच्या हैदराबाद कॅम्पसमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्यात आली आहे. या देणगीतून हैदराबाद कॅम्पसचा विकास करण्यात येणार आहे. अत्याधुनिक 430 आसनी सभागृहाच्या बांधकामाला याची मदत होणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर येथे आंतरराष्ट्रीय परिषद, संशोधन परिसंवाद, व्याख्याने आणि इतर प्रमुख शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याची क्षमता वाढणार आहे.
पायाभूत सुविधांसाठी देणगीचा उपयोग : "ISB ला शिक्षण आणि संशोधनात जागतिक दर्जाची संस्था बनण्याच्या दृष्टीकोनातून विविध देणगीदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ISB ला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी देणगीरांचा मोठा वाटा आहे.' रामोजी फाऊंडेशन'च्या या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. संस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी या देणगीचा उपयोग होईल," अशी प्रतिक्रिया ISB बोर्डाचे अध्यक्ष हरीश मनवानी यांनी दिली.
संस्थेची भरभराट होण्यास मदत : “ISB चा इतिहास परोपकारी समर्थनानं भरलेला आहे. यामुळे संस्थेची भरभराट होण्यास मदत झाली आहे. 'रामोजी फाऊंडेशन'ने दिलेली देणगी संस्थेच्या वाढीस महत्त्वपूर्ण मदत करेल आणि आम्ही जागतिक दर्जाचे शिक्षण अनुभव देत राहू याची खात्री देतो," अशी प्रतिक्रिया डीन मदन पिल्लुतला यांनी दिली.
रामोजी राव यांची वचनबद्धता : देशातील सर्व स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी रामोजी राव यांची वचनबद्धता अधोरेखित करताना, 'रामोजी फाऊंडेशन'चे विश्वस्त किरन राव म्हणाले, “या देणगीमुळं 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस'ला जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करण्यात मदत होईल. या योगदानामुळं रामोजी राव यांच्या स्मृतींचा सन्मान होईल. या संस्थेमधून शैक्षणिक चर्चा आणि ज्ञानाची देवाणघेवाण होईल."
'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' (ISB) ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बिझनेस स्कूल आहे. ही संस्था हैदराबाद आणि मोहाली कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण व्यवस्थापन शिक्षण देते. जागतिक बिझनेस स्कूलमध्ये या संस्थेनं स्थान मिळवलं आहे.