देहराडून Kedarnath Rescue Operation : केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनानंतर आज चौथ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. आज भारतीय सैन्य दलाची बचावकार्यात मदत घेण्यात आली. सैन्य दलाचे 40 जवान सोनप्रयाग-गौरीकुंड दरम्यानचा बंद रस्ता सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. आज सकाळपासूनच भाविकांचं बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 9099 भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेलिकॉप्टरद्वारे होणार बचावकार्य : केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनानंतर केदारनाथ यात्रा बाधित झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भाविक अडकले आहेत. आता या अडकलेल्या भाविकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी भारततीय सैन्य दलातील जवान कार्यरत आहेत. या अडकलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्यापही केदारनाथ परिसरातील हवामान स्वच्छ झालं नाही. सध्या चिरबासा आणि भिंबळी इथं काही भाविक अडकले आहेत. या भाविकांना बचावण्यासाठी लवकरच मोहीम राबवली जाईल. MI 17 आणि चिनूक हेलिकॉप्टरद्वारे चारधाम हेलिपॅडवरून प्रवाशांची सुटका करण्यात येणार आहे. केदारनाथ धाम पायी मार्गावरील झालेल्या भूस्खलनानंतर तिसऱ्या दिवशी 729 भाविकांना विमानानं सुरक्षितस्थळी नेण्यात आलं, तर 1162 भाविकांना पायी मार्गानं बचावण्यात आलं.
आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू : केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केदारनाथ धाम इथून 117 यात्रेकरू पायी चामसीला पोहोचले. जिल्हा दंडाधिकारी सौरभ गहवार यांनी सांगितलं की, "केदारनाथ मार्गावरील आपत्तीमुळे आतापर्यंत 2082 यात्रेकरू हेलिकॉप्टरनं, 6,546 पायी आणि 420 यात्रेकरू पर्यायी मार्गानं चामसी गावात पोहोचले. आतापर्यंत केलेल्या बचावकार्यात 9099 भाविकांचा प्राण वाचला आहे. यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले असून 1 जण अद्याप बेपत्ता आहे. तर टिहरीमध्ये 3, हरिद्वारमध्ये 4, डेहराडूनमध्ये 6, चमोलीमध्ये 1, रुद्रप्रयागमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे." घटनास्थळावर जिल्हाधिकारी सौरभ गहवार आणि पोलीस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे या तळ ठोकून आहेत.
हेही वाचा :