नवी दिल्ली Highest temperature in Delhi : राजधानीत प्रचंड उष्णतेमुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी दिल्लीतील मुंगेशपूरमध्ये 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. जे आतापर्यंतचं सर्वोच्च तापमान आहे. याआधी मंगळवारी दिल्लीतील मुंगेशपूर भागात तापमान 50 अंशांच्या जवळ नोंदवलं गेलं होतं. तर, नजफगढ भागात 49.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नवी दिल्लीच्या तापमानाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या तापमान 44 अंश सेल्सिअस आहे.
दिल्लीत आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान : हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दिल्लीत आतापर्यंतचं हे सर्वाधिक तापमान आहे. तापमानाचा पारा वाढण्यामागील कारण स्पष्ट करताना, आयएमडीचे प्रादेशिक प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा फटका शहराच्या बाहेरील भागांना बसतोय. "दिल्लीचे काही भाग या उष्णतेच्या लाटा झेलण्यास सक्षम नाहीत. त्यामुळं आधीच खराब हवामान असताना दिल्लीत आणखी वाईट परिस्थिती झालीय. मुंगेशपूर, नरेला, नजफगढ यांसारख्या भागात उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो, असं त्यांनी सांगितलं.
- "मोकळ्या भागात किरणोत्सर्ग वाढताना दिसतोय. थेट सावली तसंच हवेतील आद्रतेच्या अभावामुळं सूर्यप्रकाश थेट पोहतोय. त्यामुळं या भागातील तापमानात वाढ झालीय," असं स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले. जेव्हा पश्चिमेकडून वारे वाहतात, तेव्हा त्याचा सर्वात आधी या भागांवर परिणाम होतो. त्यामुळं तापमानात वाढ होऊन गरमी वाढते.
विजेची मागणी वाढली : उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत दिल्लीतील विजेची मागणीही 8 हजार 302 मेगावॅटच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमानात वाढ झाल्यानं बुधवारी शहराची कमाल वीज मागणी 8 हजार 302 मेगावॅट होती. राष्ट्रीय राजधानीच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेच्या मागणीनं ८ हजार ३०० मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मागणी ८ हाजर २०० मेगावॅटपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वीज वितरण कंपन्यांनी व्यक्त केलाय.
सायंकाळी रिमझिम पाऊस : सततच्या वाढत्या तापमानात बुधवारी सायंकाळी वातावरणात बदल झाल्याचं देखील दिसून आलं. अनेक भागात रिमझिम पाऊस झाल्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास इंडिया गेटच्या परिसरात पावसानं हजेरी लावल्याने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. तत्पूर्वी, उष्णतेच्या लाटेबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) बुधवारी सांगितलं की, उष्णतेची लाट 31 मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतरच हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :