नवी दिल्ली Hemant Soren ED Inquiry : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स पाठवलं होतं. मात्र त्यानंतर हेमंत सोरेन ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. ईडीनं हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापेमारी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानात रोख रक्कम आढळून आली आहे. आता हेमंत सोरेन यांनी बुधवारी ईडी अधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणनं मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मनी लाँड्रींग प्रकरणात समन्स : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं समन्स पाठवलं होतं. मात्र दहा समन्स पाठवल्यानंतरही हेमंत सोरेन हे ईडी चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घराची झाडाझडती घेतली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल 13 तास तळ ठोकला.
हेमंत सोरेन यांच्या घरातून रोख रक्कम जप्त : ईडीच्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घराची झाडाझडती घेतली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांना 36 लाख रुपये आढळून आले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 13 तासाच्या कारवाईत ही रक्कम शोधून काढली. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार जप्त केली आहे. हेमंत सोरेन यांच्या घरातून काही कागदपत्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी ईडी चौकशीला जाणार सामोरं : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात ईडी आक्रमक झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीपासून ते रांचीपर्यंत मोर्चेबांधणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे पुढं आले आहेत. हेमंत सोरेन यांनी आपण बुधवारी ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट केलं. बुधवारी दुपारी हेमंत सोरेन हे त्यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांच्या समोर चौकशीला हजर राहण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व आमदार आणि खासदारांना रांची न सोडण्याबाबत कळवण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :