नवी दिल्ली New Election Commissioners : लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. मात्र निवडणुकीच्या अगोदरचं निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही यावेळी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान निवडणूक आयोग उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार असून लोकसभेच्या तारखा घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार लोकसभेच्या तारखा ? : निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेणार असून लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत निवडणुकीची आचार संहिता कधीपासून लागणार याबाबत स्पष्टता येणार आहे. त्यासह लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखांही जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महत्वाच्या टप्प्यावर नियुक्ती : देशात सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची जोरदार तयारी सुरू आहे. सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहेत. अशात निवडणूक आयोगात दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचं स्वागत केलं आहे. यावेळी "निवडणूक आयोग पुढील आठवड्यापासून मोहिमेवर निघण्यासाठी सज्ज आहे," असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आली नियुक्ती : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारवर मोठी टीका करण्यात येत होती. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीनं दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या समितीत केद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. या समितीनं गुरुवारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार एकाच वेळी ?; निवडणूक आयुक्तांनी दिली 'ही' माहिती
- दोन निवडणूक आयुक्तांची 15 मार्चपर्यंत नियुक्ती होण्याची शक्यता; निवडणुकांच्या तोंडावर आयोगावर आलाय भार
- पक्ष लागले निवडणुकीच्या तयारीला, राज्य निवडणूक आयोगाकडं तब्बल 400 पक्षांची नोंदणी!