दाहोद (अहमदाबाद) Gujarat School girl murder : गुजरात राज्यातील सिंगवड तालुक्यात १९ सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही पाच वर्षांची चिमुकली प्राथमिक शाळेत शिकण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे.
बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा पालक आणि नातेवाईकांकडून शोध घेण्यात आला. ही चिमुकली शाळेच्या आवारात बेशुद्धावस्थेत आढळली. मुलीला सिंगवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी चिमुकलीला लिमखेडा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
गुदमरल्यानं चिमुकलीचा मृत्यू : झायडस हॉस्पिटल दाहोद येथे चिमुकलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आले. या संदर्भात पोलिसांनी रणधिकपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी १० पथके नेमली.
तपासाकरिता चक्रे फिरली- जिल्हा पोलीस उपअधीक्षक राजदीपसिंग झाला यांनी तातडीने लिमखेडा शासकीय रुग्णालयाह शाळेतील आवाराला भेट दिली. पोलीस स्टेशनचे बालकल्याण अधिकारी (CWO), फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, फॉरेन्सिक फिंगरप्रिंट तज्ज्ञांचे पथक, श्वानपथक पथकासह घटनास्थळी पाचारण करून कसून तपास केला. चिमुकलीच्या आईनं तिला शाळेच्या मुख्याध्यापकांसह चारचाकीत शाळेला जाण्यासाठी बसवून पाठवलं होतं.
आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल: अटक होऊ नये म्हणून शाळेचा मुख्याध्यापक आचार्य गोविंद नट याने पोलिसांची दिशाभूल केली. त्याच्या दाव्यानुसार त्यानं मुलीला कारमधून शाळेत आणले. पण नंतर ती कारमधून उतरुन कुठे गेली, हे मला माहीत नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणं रोजच्या कामाला लागलो. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर मुलीच्या वर्गशिक्षिकेने मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
पोलिसांनी असा केला तपास- चिमुकली शाळेत आली नव्हती. याबाबत शाळेतील वर्गशिक्षकासह मुलांनी दुजोरा दिला. शाळा सुटल्यानंतर तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता एका विद्यार्थ्यानं शाळा सुटल्यानंतर चिमुकली मुख्याध्यपकांच्या कारमध्ये झोपल्याची माहिती दिली. आरोपी आचार्य गोविंद नट पोलिसांना तपासात सहकार्य करत नव्हता. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केलं. शाळेत पोहोचण्यासाठी मुख्याध्यापकाला दररोज लागणाऱ्या वेळेपेक्षा घटनेच्या दिवशी जास्त वेळ लागला. तसेच, कॉल रेकॉर्डच्या आधारे मुख्याध्यापकाविरोधातील पुरावे पोलिसांना मिळाले.
गुन्ह्याची दिली कबुली- आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यानं चिमुकलीचा कारमध्ये विनयभंग केला. त्यामुळे तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचे तोंड दाबल्यानंतर बेशुद्ध झाली. तिला कारच्या मागच्या सीटवर बसवून शाळेत नेले. शाळा सुटल्यानंतर शाळेची खोली आणि कंपाऊंड भिंतीच्यामध्ये बसवले. तिची शाळेची बॅग आणि चप्पल वर्गाबाहेर सोडली. शाळेतच चिमुकल्या सुरक्षित नसल्यानं पालकवर्गामध्ये चिंता वाढली आहे. नुकतेच महाराष्ट्रातील बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील स्वच्छता कामगारानं अत्याचार केल्याची घटना घडली होती.