बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा (SM Krishna Passes Away) यांचं मंगळवारी (10 डिसेंबर) पहाटे 2.45 वाजता राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे नेण्यात येणार आहे. सोमनहल्ली मल्लैया कृष्णा यांच्या पश्चात पत्नी प्रेमा आणि दोन मुली शांभवी, मालविका असा परिवार आहे.
सुरुवातीचं शिक्षण : एस एम कृष्णा यांचा जन्म 1 मे 1932 रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली येथे झाला. कृष्णा यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी डॅलस, टेक्सास येथील 'सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ' आणि वॉशिंग्टन, डीसी येथील 'जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात' शिक्षण घेतलं. येथील लॉ स्कूलमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मद्दूर विधानसभेची जागा जिंकून त्यांनी राजकारणात आपली कारकीर्द सुरू केली.
- राजकीय कारकीर्द : 1999 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एस एम कृष्णा हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यात पक्षाचा विजय झाला. ते मुख्यमंत्री झाले. कृष्णा हे 11 ऑक्टोबर 1999 ते 28 मे 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात 2009 ते 2012 या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलं. त्यानंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते प्रजा सोशालिस्ट पार्टीशी संबंधित होते. मार्च 2017 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
- कृष्णा यांनी डिसेंबर 1989 ते जानेवारी 1993 पर्यंत कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. 1971 ते 2014 दरम्यान ते अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यही होते. एस एम कृष्णा हे कर्नाटक विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हींचे सदस्य होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री (1993 ते 1994) म्हणूनही काम केलं होतं.