नवी दिल्ली Farmers Protest : पंजाबमधील शेतकरी केंद्राच्या विरोधात आंदोलन करत आहेत. यावरुन भाजपाचे सदस्य आणि माजी कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित केलंय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असून ते कतारलाही भेट देणार आहेत.
-
Is it proper for the Prime Minister to be absent from the country when not only a General Election is imminent but a serious uprising near New Delhi of Punjab farmers could become violent and be a blow up. Modi must understand a PM’s priorities and not be galavanting now.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 14, 2024
काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी : शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केलीय. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "मोदींनी पंतप्रधानांनी कशाला प्राधान्य द्यायचं ते समजून घेतलं पाहिजे. सार्वत्रिक निवडणुका जवळ असताना पंजाबमधील शेतकऱ्यांचं नवी दिल्लीजवळचं आंदोलन हिंसक होऊन तिथं धक्काबुक्की होऊ शकते. तेव्हा पंतप्रधानांनी देशात अनुपस्थित राहणं योग्य आहे का? मोदींनी पंतप्रधानांचे प्राधान्यक्रम समजून घेतले पाहिजेत." तसंच नरेंद्र मोदी सरकारकडून पंजाबच्या शेतकऱ्यांविरोधात ड्रोनचा वापर केल्याचा सवालही स्वामी यांनी उपस्थित केलाय.
शेतकऱ्यांकडून दिल्ली चलोची घोषणा : पंजाबमधील हजारो शेतकरी बुधवारी राज्य आणि हरियाणाच्या दोन सीमेवर थांबले तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हरियाणातील अंबालाजवळील शंभू सीमेवर आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकरी त्यांचं 'दिल्ली चलो' आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी तिथं जमत असताना, दिल्लीच्या दिशेनं कूच करण्याच्या प्रयत्नात शंभू सीमेवर बहुस्तरीय बॅरिकेड्स तोडण्याच्या त्यांच्या योजनेसह पुढं जाण्यापूर्वी शेतकरी नेते एक बैठक घेणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय : किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसह पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेनं कूच केलीय. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर घेऊन रेशनसह दिल्लीच्या वेशीवर आले आहेत. सोमवारी (12 फेब्रुवारी) देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंदीगडमध्ये केंद्र सरकारनं चर्चा केली. मात्र, या चर्चेत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलंय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंदोलक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यामुळं हरियाणा पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय. तसंच या सर्व प्रकारामुळं शंभू सीमेवर तणावाचं वातावरण बघायला मिळतंय.
हेही वाचा :