नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या विधानांवर आक्षेप घेतलाय. दोघांनीही आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगानं भाजपा, काँग्रेसला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.
भाजपासह काँग्रेसला उत्तर दाखर करण्याचे आदेश : भाजपा तसंच काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समुदाय तसंच भाषेच्या आधारावर समाजात फूट निर्माण केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात दोन्ही पक्षांना 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना जाब विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींवर, तर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगानं म्हटलंय की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयोगाच्या नोटिशीवर काँग्रेसची प्रतिक्रिया : निवडणूक आयोगानं काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसवर जयराम रमेश म्हणाले की, "आम्ही आयोगाकडं तक्रार केली होती. भाजपा धर्माचा निवडणूक प्रचारात दुरुपयोग करत आहे. हे खूप चिंताजनक आहे. आम्ही या नोटीसला उत्तर देऊ."
निवडणूक आयोगानं का पाठवली नोटीस? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 एप्रिल रोजी राजस्थानमधील बांसवाडा सभेत सांगितलं की, "काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्यास लोकांची संपत्ती ताब्यात घेऊन घुसखोरांमध्ये वाटप करेल. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर माता-भगिनींच्या सोन्याच्या दागिण्याचं वाटप करण्यात येईल." पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता."
राहुल गांधींविरोधात तक्रार : त्याचवेळी भाजपानं राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केलीय. राहुल गांधी यांनी भाषेच्या आधारे तामिळनाडूमध्ये लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपानं केला. राहुल गांधी भाषेच्या आधारे उत्तर आणि दक्षिण भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला होता. त्यामुळं भाजपानं लेखी तक्रारीत राहुल गांधींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
हे वाचलंत का :
- आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान देशाच्या ऐक्याला धक्का देणारं : शरद पवारांचा हल्लाबोल - Sharad Pawar On Pm Narendra Modi
- निवडणुकीपूर्वी आक्षेप नोंदवायला हवा होता; आता चिन्ह रद्द करता येणार नाही - अधिकारी - Lok Sabha Election 2024