नवी दिल्ली ED Arrested CM Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच मागं घेतलीय. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्या कोठडीबाबत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही इथून याचिका मागं घेत आहोत, म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही. खुद्द अभिषेक मनु सिंघवी यांनी याला दुजोरा दिलाय.
ईडी करणार कोर्टात हजर : दुसरीकडे, कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. या प्रकरणी ईडी आज केजरीवाल यांना हजर करणार असून कोठडीची मागणी करू शकते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील निदर्शनं पाहता, ईडी केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करु शकते.
दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण नाही : अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च गुरुवार रोजी दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण न मिळाल्यानं ईडीनं दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली. आज दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही या प्रकरणी हजर करण्यात येणार असून, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.
आपकडून ठिकठिकाणी आंदोलन : दुसरीकडं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानं आम आदमी पक्षाच्या वतीनं गुरुवारी रात्रीपासून देशभरात ठिकठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन निदर्शनं करण्यात येत आहेत. तसंच विरोधी पक्ष त्यांच्या अटकेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
हेही वाचा :