नवी दिल्ली- दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार आहे. न्यायालयानं त्यांना 15 एप्रिल रोजी 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना तिहार तुरुंगात सोमवारी इन्शुलिन देण्यात आलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात सोमवारी इन्सुलिनचे डोस देण्यात आले. ही माहिती दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " अरविंद केजरीवाल यांची सोमवारी साखरेची पातळी 217 होती. साखरेची पातळी 200 ओलांडल्यानंतर कमी डोसचं इन्सुलिन दिले जाऊ शकते, असे एम्सच्या टीमनं सांगितलं. त्यानंतर अखेर तुरुंग प्रशासनानं मुख्यमंत्र्यांना इन्सुलिन दिलं आहे. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना इन्शुनिलनसाठी न्यायालयात जावं लागत आहे. तरीही भाजप आणि केंद्र सरकारचे अधिकारी सर्व कैदी सारखेच असल्याचं सांगतात."
इन्शुलिन देण्यावरून वाद- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या इन्सुलिनच्या डोसबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आम आदमी पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी इन्सुलिनच्या मुद्द्यावरून तिहार तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटलं, " तुमचे वर्तमानपत्रात आलेले वक्तव्य चुकीचं आहे. तुमचे खोटे विधान वाचून खूप वाईट वाटले. मी गेल्या 10 दिवसांपासून सातत्यानं इन्सुलिनचा मुद्दा १० दिवसांपासून अनेक वेळा मांडत आहे. माझी साखर खूप जास्त असल्याचंही डॉक्टरांना सांगितलं. तरीही केजरीवाल यांनी इन्शुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही, असे तुम्ही खोटे विधान कसे करू शकता?".
एम्सच्या टीमचा सल्ला घेण्याचे आदेश- अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल करत डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची परवानगी मागितली. ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, "केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास असल्यानं इन्सुलिनची गरज आहे. मात्र, केजरीवाल यांना विशेष उपचारांची आवश्यकता असल्यास त्यांनी एम्सच्या संचालकांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय बोर्डाचा सल्ला घ्यावा, असे न्यायालयानं म्हटलं आहे.
तिहार तुरुंग प्रशासनाचा काय आहे दावा- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगात वजन कमी झाल्याचा आम आदमी पक्षाकडून आरोप करण्यात आला होता. त्यावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संजय बेनिवाल म्हणाले, "ते ( अरविंद केजरीवाल) इतर कैद्यांप्रमाणे सामान्य जीवन जगत आहेत. तुरुंगात जेवण देण्याची ठराविक वेळ असते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरचं जेवण मिळते. तिहार तुरुंग प्रशासनाकडून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना अहवाल सादर करण्यात आला. त्यावर संजय बेनिवाल म्हणतात, "नायब राज्यपाल हे आमचे कार्यकारी प्रमुख आहेत. ते इतर मुद्द्यांवरही आमच्याकडून अहवाल मागतात. यात नवीन काहीही नाही."
21 मार्च रोजी अटक- अरविंद केजरीवाल यांनी 28 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी राजकीय षडयंत्रातून अटक केल्याचा दावा केला होता. त्यांनी न्यायालयात स्वत: बाजू मांडताना आम आदमी पक्षाला संपविणं हे ई़डीचं उद्दिष्ट असल्याचं युक्तीवाद करताना म्हटलं होतं. या प्रकरणात अटक केलेल्या शरद रेड्डीनं भाजपाला इलेक्टोरल बाँडच्या स्वरुपात 55 कोटी रुपये दिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-