नवी दिल्ली Delhi liquor Scam : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तब्बल 9 वेळा समन्स पाठवलं आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीपुढं हजेरी लावणं टाळलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी "तुम्ही ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर का होत नाही," अशी विचारणा न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना केली.
उच्च न्यायालयाचे अरविंद केजरीवाल यांना सवाल : दिल्ली दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला केराची टोपली दाखवली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी न्यायालयानं त्यांना "तुम्ही चौकशीला ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर का होत नाही," असा सवाल न्यायालयानं केला. "ईडी तुम्हाला साक्षीदार किवा आरोपी म्हणून बोलावत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल उद्या हजर राहू शकतात का," असा सवालही यावेळी न्यायालयानं त्यांना विचारला.
ईडी पहिल्याच हजेरीत अटक करणार नाही : दिल्ली दारू घोटाळ्यात अटक टाळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स बजावण्यात आले, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. आम्ही सर्व समन्सचे जबाब दिले आहेत. आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. आम्हाला चौकशीला जाण्यास काही अडचण नाही. परंतु काही संरक्षण आवश्यक आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाकडं स्पष्ट केलं. आपल्याला साक्षीदार किंवा आरोपी म्हणून बोलावलं जात आहे, असं त्यांनी यावेळी न्यायालयात विचारलं. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं "तुम्ही हजर झाल्यावरच कळेल. तुमच्या पहिल्या हजेरीत ईडी तुम्हाला अटक करणार नाही. कारण दिल्यानंतरच ईडी अधिकारी तुम्हाला अटक करतील," असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :