नवी दिल्ली - इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढावे लागणार आहे.
नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-काँग्रेसची युती होणार असल्याच्या राजकीय चर्चांवर भूमिका स्पष्ट केली. आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं.
Aam aadmi party will be fighting this election on its own strength in Delhi. There is no possibility of any alliance with congress. https://t.co/NgDUgQ8RDo
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 11, 2024
अरविंद केजरीवाल यांनी X मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही". मंगळवारी राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप एकट्यानंच लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
- आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत पक्षानं 11 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या यादीत सोमवारी 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आम आदमी पक्षाकडून दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. केजरीवाल हे जनतेमध्ये जाऊन त्यांचे मत जाणून घेत आहेत.
आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा सरकार बनवल्यास सर्व वाहन मालकांसाठी केजरीवाल यांनी 5 हमी योजना जाहीर केल्या आहेत.
• प्रत्येक ड्रायव्हरसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघात विमा.
• मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांची मदत
• वर्षातून दोनदा गणवेशासाठी 2500 रुपये
• स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षणाचा खर्च उचलेल.
• ‘Ask App’ रीस्टार्ट होणार आहे.
भाजपाचा विधानसभा निवडणुकीत पराभव- 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं दिल्लीतील सर्व सात लोकसभा जागा विक्रमी मतांनी जिंकल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेनं भाजपाला पूर्णपणे नाकारले. दिल्लीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 56.85 टक्के मते मिळाली होती. दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागा भाजपानं विक्रमी मतांनी जिंकल्या होत्या. 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 38.51 टक्क्यांवर आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपानं 70 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या.
हेही वाचा-