नवी दिल्ली Congress Press Conference : निवडणूक रोख्यांवरुन काँग्रेस नेत्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर हल्लाबोल केला. "सत्ताधाऱ्यांनी निवडणूक रोख्यातून आपली खाती भरली आहेत. मात्र काँग्रेसला केवळ 11 टक्के रोखे मिळाले," असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. तर आमचं बँक खातं नाही, तर सत्ताधाऱ्यांनी लोकशाही गोठवली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अजय माकन आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी यावेळी सत्ताधारी भाजपावर टीका केली.
काँग्रेस पक्षाचं अकाऊंट केलं फ्रिज : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीत निवडणूक रोखे प्रकरणावरुन भाजपावर मोठा हल्लाबोल करण्यात आला. "सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचं बँक अकाऊंट गोठवलं," असा दावा यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मागील व्यवहारावरुन हे बँक अकाऊंट फ्रिज केल्याचा दावा यावेळी राहुल गांधी यांनी केला. "एखाद्या कुटुंबाचं बँक खातं फ्रिज केलं तर, त्या कुटुंबावर आत्महत्येची वेळ येते. आमचं बँक खातं गोठवण्यात आलं. एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आलं. देशातील सर्वात महत्वाच्या विरोधी पक्षाच्याबाबत हे पाऊल उचलण्यात आलं. ही लोकशाहीची हत्या आहे," असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
आम्ही दोन रुपये देऊ शकत नाही : "देशात सर्वात मोठी लोकशाही आहे, मात्र सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचं बँक खातं गोठवण्यात आलं आहे. या विरोधात एकही यंत्रणा बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ही कारवाई केली," असा आरोप राहुल गांधी यांनी केला. "देशातील 20 टक्के नागरिक काँग्रेस पक्षाला मतं देतात. मात्र आज आम्ही एका नेत्याचं रेल्वेचं तिकीट नाही काढू शकत. सात वर्षाच्या अगोदर 7 लाखाच्या व्यवहारासाठी कोट्यवधी रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. देशात लोकशाही नाही, या विरोधात कोणीही काहीच बोलत नाही," असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
हेही वाचा :