नवी दिल्ली Gourav Vallabh Resigns Congress : काँग्रेसचे नेते गौरव वल्लभ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. "सनातन धर्माविरोधात घोषणा देऊ शकत नाही," असं कारण त्यांनी राजीनामा देताना नमूद केलं आहे. गौरव वल्लभ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानं हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.
सनातन धर्माविरोधात घोषणा देऊ शकत नाही : गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडं पाठवलं आहे. यात त्यांनी काँग्रेस पक्ष आज दिशाहीन मार्गानं पुढं जात आहे, त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ आहे. मी सनातन धर्माविरोधात घोषणाबाजी करू शकत नाही. देशाच्या संपत्ती निर्माण करणाऱ्या घटकांचा गैरवापरही करू शकत नाही. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे, असं गौरव वल्लभ यांनी नमूद केलं आहे.
काँग्रेसची वाटचाल चुकीच्या पद्धतीनं : काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना गौरव वल्लभ यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "काँग्रेस पक्षाची वाटचाल सध्या काँग्रेसच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात सुरू आहे. थोडक्यात ती चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. एकीकडं आपण जातनिहाय जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडं संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे समाजाला दिशाभूल करणारा संदेश मिळत आहे. काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धर्माचा समर्थक आहे, हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे," असं गौरव वल्लभ यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केलं आहे.
कोण आहेत गौरव वल्लभ : गौरव वल्लभ हे काँग्रेसचे नेते म्हणून गणले जातात. त्यांनी 2019 मध्ये झारखंडच्या जमशेदपूर पूर्व इथून निवडणूक लढवली होती. गौरव वल्लभ यांनी तत्कालिन मुख्यमंत्री रघुबर दास आणि सरयू रॉय यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. गौरव वल्लभ यांनी 2023 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत उदयपूर इथून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपाच्या उमेदवारानं त्यांचा 32 हजार मतानं पराभव केला होता.
हेही वाचा :