पाटणा - गेली काही दिवस जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor News) यांच्या आंदोलनामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच पाटणा पोलिसांनी पहाटे जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पाटणा पोलिसांचं पथक प्रशांत किशोर यांना ताब्यात घेण्यासाठी गांधी मैदानात पोहोचलं. प्रशांत किशोर यांना जबरदस्तीनं आंदोलनस्थळावरून उचलून नेण्यात आलं. बिहार लोकसेवा आयोगाच्या बीपीएससी परीक्षेच्या उमेदवारांकडून फेरपरीक्षा घेण्याकरिता आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रशांत किशोर यांनी करत गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवलं.
- "पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी जन सुराज पक्षाच्या प्रमुखांनी पुढील रणनीती सांगितली. प्रशांत किशोर म्हणाले, "आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही. आम्ही 7 जानेवारीला पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत."
भाजपाची 'बी' टीम असल्याची टीका- नुकतेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) बीपीएससी आंदोलनावरून राजकारण केल्याचा आरोप केला. आंदोलनात सामील होणारे हे लोक भाजपाची 'बी' टीम आहेत, असे म्हणत त्यांनी प्रशांत किशोर यांना टोला लगावला होता. यावर प्रशांत किशोर यांनी उत्तर देताना तेजस्वी यादव यांनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहन केलं. बीपीएसीची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
गांधी मैदानात पहाटे काय घडलं?
- पहाटे 4 वाजता जवळपास दहा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गांधी मैदानात पोहोचले.
- कडाक्याच्या थंडीतही प्रशांत किशोर हे परीक्षार्थी उमेदवारांसह आंदोलनावर ठाम राहीले.
- प्रशांत किशोर यांना पोलिसांनी बळजबरीनं नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विरोध केला.
- प्रशांत किशोर यांच्या समर्थकांच्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्यानं प्रशांत किशोर यांच्या कानशिलात लगावली.
- मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. तसेच आमरण उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रशांत किशोर यांच्यावर अटकेची कारवाई- पाटणाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह म्हणाले, ''प्रशांत किशोर आणि इतर काही लोक त्यांच्या पाच कलमी मागण्यांसाठी मनाई असलेल्या गांधी मैदानातील गांधी पुतळ्यासमोर बेकायदेशीरपणे आंदोलन करत होते. प्रशासनानेही तेथून निघून जाण्यासाठी नोटीस दिली होती. त्यांच्यासाठी गार्डनीबाग या आंदोलनासाठी निश्चित केलेल्या जागेवर जाण्यास सांगितल होतं. बेकायदेशीर आंदोलनामुळे किशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच कारणावरून त्यांना पहाटे प्रशांत समर्थकांसह अटक करण्यात आली. त्यांची प्रकृती निरोगी आहे. पाटणाचे एसएसपी आकाश कुमार यांनी सांगितलं, "प्रशांत किशोर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे."
जन सुराज पक्षानं नितीश कुमार यांच्यावर साधला निशाणा- प्रशांत किशोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जन सुराज पक्षानं एक्स हँडलवर पोस्ट करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. " बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भित्रेपणा दाखवून दिला आहे. उद्धवस्त झालेली शिक्षणव्यवस्था आणि भ्रष्ट परीक्षेच्या विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या प्रशांत किशोर यांना बळजबरीनं ताब्यात घेण्यात आलं आहे. सोबत बसलेल्या तरुणांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आहे."
हेही वाचा-