Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या सुखासाठी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेत त्यांनी शत्रूशी दोन हात केले. तसंच एका आदर्श स्वराज्याचीही निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिलाय. तसंच त्यांची गुणवैशिष्ट्यंही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत.
भारतीय नौदलाचे जनक : स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (father of Indian Navy) असं म्हटलं जातं. त्यांनी मराठा नौदल दलाची स्थापना केली, तटबंदीचे नौदल तळ बांधले तसंच नाविन्यपूर्ण नौदल रणनीती सादर केली. तसंच त्यांच्या नौदलाच्या प्रयत्नांनी भारतातील भविष्यातील सागरी ऑपरेशन्ससाठी पाया घातला आणि तो नेहमीच अभ्यासाचा आणि कौतुकाचा विषय राहिलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांची काही खास गुणवैशिष्ट्यं :
शेतकऱ्यांची साथ कधीही न सोडणारा राजा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृषी क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. 'रयत सुखी आणि राजा सुखी, शेतकरी सुखी आणि राजा सुखी' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. प्रशासकीय, जमीन महसूल, पाणी, राजकीय, लष्करी, नागरी, न्यायिक, उद्योग, या धोरणांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण हे वर्तमानात तसेच भविष्यातही हजारो वर्षांसाठी मार्गदर्शक ठरेल. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्यातील शेतीचा पाया घातला. त्यांच्यामुळं शेतकऱ्यांना समाजात मानाचं स्थान मिळालं. त्यावेळचे त्यांचे शेतीविषयक विचार आजच्या धोरणकर्त्यांनाही विचार करायला लावणारे आहेत.
शिवाजी महाराजांचा काळ, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या : शिवकाळात अनेक दुष्काळ पडले. सिंचनाचे प्रमाण कमी होते. उद्योग आणि व्यवसाय मर्यादित होते. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. यामगचं कारण म्हणजे शिवरायांचे शेती आणि शेतकऱ्यांबाबतचे धोरण. त्यांच्या अनेक पत्रांतून आणि आज्ञापत्रांतून ते दिसून येते. स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात त्यांनी शेतकऱ्यांचा कधीही छळ होऊ दिला नाही. 23 ऑक्टोबर 1662 रोजी सर्जेराव जेधे यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, "मुघल सैन्य (शाहिस्तेखान) तुमच्या हद्दीत येत असल्याची गुप्तहेरांनी खबर दिली आहे. त्यामुळं तेथील सर्व रयतेला त्यांच्या मुलांसह सुरक्षित स्थळी पाठवावं. गावोगावी जाऊन समुद्रतळ जपणाऱ्यांचे हित जोपासावे. या कामात काळजी घ्यावी." शिवरायांची शेती आणि शेतकरी चक्रातून वाचला पाहिजे ही चिंता आजही दिशादर्शक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून लढाया केल्या नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले.
प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा राजा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रदेश काबीज केले. त्यांच्या शत्रूंनी काबीज केलेल्या भूमीतील स्त्रियांशी जो व्यवहार केला त्याउलट, शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला कैद केलं नाही. त्यांच्या काळात बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात होती. तसंच त्यांनी आपल्या सैन्यालाही प्रत्येक स्त्रीचा धर्म किंवा वंश विचारात न घेता नेहमी त्यांचा आदर करावा असं सांगितलं.
महिला सक्षमीकरण : शिवाजी महाराजांनी महिलांचे सक्षमीकरण करून आणि त्यांना अधिकारपदं देऊन पुरोगामी दृष्टिकोन दाखवला. त्यांनी त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि शासनाच्या विविध क्षेत्रात सक्रिय सहभागास प्रोत्साहन दिलं.
सामाजिक सुधारणा आणि कल्याण : शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशानं अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांनी व्यापाराला चालना दिली आणि महिला आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणारी धोरणं अंमलात आणली. त्यांनी एक मजबूत न्यायप्रणाली स्थापन केली, तसंच त्यांच्या सामाजिक स्थितीची पर्वा न करता सर्वांसाठी समान वागणूक सुनिश्चित केली. तसंच धर्माच्या अनुयायांशी त्यांची वागणूक अतिशय न्याय्य होती.
प्रभावी संघटक : छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील महान संघटक म्हणून ओळखले जातात. आपल्या विलक्षण सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र केलं आणि त्यांना संघटित ताकदीत रूपांतरित केलं.
एक कुशल मुत्सद्दी : त्यांनी कधीही त्याच्या शत्रूंना त्याच्याविरुद्ध एकत्र येऊ दिलं नाही. आपल्या मुत्सद्देगिरीमुळं त्यांनी आपल्या वडिलांना विजापूरच्या सुलतानापासून मुक्त केलं. आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेतून त्यांची सुटका हे त्यांच्या मुत्सद्देगिरीचे प्रमाण सांगते.
प्रशासकीय कौशल्ये: शिवाजी महाराज हे महान क्षमता आणि व्यावहारिक दृष्टी असलेले प्रशासक होते. विविध विभागांचे कामकाज ते स्वत: पाहत असत.
निर्णायकता : कोणत्याही माणसाच्या जीवनात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परिस्थितीनुसार निर्णय घेणं महाराजांना अचूक जमायचं. गरज असेल तेव्हा शत्रूवर हल्ला करण्याचा निर्णय असो किंवा योग्य ठिकाणी माघार घेण्याचा निर्णय असो, ते प्रत्येक निर्णय अचूक घ्यायचे.
हेही वाचा -
- Modi Language : छत्रपती शिवरायांमुळे प्रचारात आली मोडी लिपी; जिल्हा परिषद शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिकून रचला इतिहास
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं शिवनेरीवर सादरीकरण; पाहा व्हिडिओ
- दोन वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद; राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त