मुंबई - Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप काही लिहिलं आणि वाचलं गेलं आहे. पण त्यांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे अनेक इतिहासकारांनी डोळेझाक केली. आज छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार पुण्यतिथी आहे. संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र संभाजी राजे यांना आपल्या जीवनात अनेक गोष्टींचा त्याग फार कमी वयात करावा लागला होता. संभाजी राजांच्या आईसाहेब सईबाईंचं अकाली निधन झाल्यामुळे राजमाता जिजाऊ यांनी त्याच्या पालनपोषणाकडे लक्ष दिलं. संभाजी राजे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेले होते.
शंभूराजेंनी कमी वयात दाखवली प्रतिभा : यानंतर आग्रा येथून सुटका करून घेऊन शिवाजीराजे राजधानीत परतले होते. यानंतर सुरक्षिततेसाठी संभाजी राजांना काही दिवसांसाठी मथुरेत ठेवण्यात आलं होतं. संभाजी राजे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मथुरेतून औरंगजेबाने घातलेल्या सापळ्यातून सुखरूप सुटून 1666-67 रोजी रायगड किल्ल्यावर पोहोचले होते. मुघलांच्या छावणीत सामील झालेले संभाजी राजे मराठा स्वराज्याचे रक्षक होते. संभाजींनी वयाच्या 31 व्या वर्षी शंभरहून अधिक लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर संभाजी राजे विराजमान झाले. त्याचा राज्याभिषेक रायगडावर 16 जानेवारी 1681 रोजी करण्यात आला होता. संभाजीराजे धर्मनिष्ठ, पराक्रमी असण्याबरोबरच विद्वानही होते. त्यांना फारसीसह अनेक भाषा अवगत होत्या. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून हातावेगळा केला. संभाजीराजेंच्या विद्वत्तेची साक्ष पटवून देण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी आहेत. तलवार आणि लेखणी सारख्याच ताकदीने चालवणारा छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा विरळाच.
घरभेदी आणि मुघल दोघांविरुद्ध संघर्ष : छत्रपती संभाजीराजांचं संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेलं होतं. मुघल, सिद्दी जोहर या स्वराज्याच्या शत्रूंबरोबरच त्यांना घरातल्या म्हणजे स्वराज्यातल्या लोकांबरोबरही संघर्ष करावा लागला. या घरभेद्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण हा शिवपुत्र प्रत्येक वेळी नव्या ताकदीने उभा राहिला. जर छत्रपती संभाजी महाराजांना फितुरांशी संघर्ष करावा लागला नसता तर अधिक देदीप्यमान इतिहास त्यांनी घडवला असता. लहानपणी मातृछत्र हरपलं. त्यांच्या जाणत्या वयात दरबारातल्या स्वराज्यद्रोह्यांनी वडिलांशी म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांशी दुरावा घडवून आणला. अशा असंख्य प्रसंगांतून तावून सुलाखून निघालेल्या संभाजीराजांचं 'दिव्यत्व' अधिक सामोरं आलं.
औरंगजेबानं केला रायगडावर हल्ला : रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांची सत्ता बसताच औरंगजेबानं रायगडावर हल्ला केला. या लढाईत छत्रपती संभाजी विजयी झाले. यानंतर औरंगजेबानं मराठा साम्राज्यावर वारंवार हल्ला केले. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुल पराक्रमाची एवढी धास्ती घेतली होती की, त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करेपर्यंत डोक्यावर राजमुकुट घालणार नाही, अशी शपथ घेतली. अखेर फितुरीनं या लोकविलक्षण राजाचा घात केला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे राजकीय करणासाठी संगमेश्वरातून रायगडावर परत जात होते. यावेळीच औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांवर हल्ला केला आणि त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. पण हा स्वराज्यरक्षक सहजासहजी मुघलांच्या हाती लागला नाही. छत्रपती संभाजी महाराज मित्र कवी कलशाच्या साथीनं वाघासारखे या सैन्यावर तुटून पडले. संभाजीराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबानं क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबानं धर्म परिवर्तन करण्यास सांगितलं, मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर औरंगजेबानं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यानं महाराजांची जीभ कापली, डोळे काढले, संपूर्ण शरीर सोलून काढलं. तब्बल चाळीस दिवस पराकोटीचा छळ निडरपणे सहन केल्यानंतर स्वराज्याच्या या तेजस्वी छत्रपतीची प्राणज्योत मालवली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे तुळापूरच्या नदीत फेकले गेले. यानंतर काठावर राहणाऱ्या लोकांनी महाराजांचं पार्थिव शरीर ओळखलं. या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवण टाकून हिंदू पध्दतीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेनुसार 11 मार्च 1689 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत एका वैशिष्ट्याची दखल इतिहासानं घेतली आहे. पित्यानं स्वाभिमानानं कसं जगावं, हे शिकवलं. तर सिंहाच्या 'छाव्या'नं स्वाभिमानासाठी मृत्यूला ओशाळायला कसं लावावं, हे आपल्या बलिदानानं दाखवून दिलं.
हेही वाचा :