रांची (झारंखंड) CM Champai Soren Resigned : झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक निर्णय घेतले. झारखंडच्या राजकारणातील तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आपलं काम अत्यंत साधेपणानं केलं.
चंपाई सोरेन यांची राजकीय कारकिर्द : हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाले होते. ते सलग चार वेळा सरायकेलाचे आमदार राहिले आहेत. मात्र 2000 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते सलग विजयी झाले. झारखंड सरकारमध्ये मंत्रीही झाले. चंपाई सोरेन हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. चंपाई सोरेन यांची झारखंड चळवळीत महत्त्वाची भूमिका आहे. चंपाई सोरेन शिबू सोरेन यांच्यासोबत वेगळ्या राज्याच्या आंदोलनात सामील झाले होते. ते आपल्या लोकांमध्ये झारखंडचा वाघ म्हणून ओळखले जातात. सरायकेला मतदारसंघातून ते पहिल्यांदाच अपक्ष आमदार झाले. नंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सामील झाले. 2010 ते 13 या वर्षात ते अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर स्थापन झालेल्या झामुमो सरकारमध्ये ते पुन्हा एकदा मंत्री झाले. 2019 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांना हेमंत मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री करण्यात आलं. यासोबतच ते झामुमोचे उपाध्यक्षही आहेत.
153 दिवस राहिले मुख्यमंत्री : हेमंत सोरेन यांना ईडीनं 31 मार्च रोजी मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. मात्र, अटकेपूर्वी हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला होता. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेना मुख्यमंत्री होतील असं मानलं जात होतं. परंतु, त्यांचा अनुभव पाहता चंपाई सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज 3 जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अशा प्रकारे त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून केवळ 153 दिवस काम केलं.
हेही वाचा :