देहराडून : खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग करावं लागल्यानं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना चीन सीमेवरील एका गावात रात्र काढावी लागली. चीन सीमेजवळ असलेल्या या गावात ना फोन, ना वीज अशा स्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रात्र काढली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना खराब हवामानामुळे चीनव्याप्त तिबेट सीमेजवळ बुधवारी इमर्जन्सी लँडींग करावं लागलं. त्यानंतर राजीव कुमार यांच्यासह एकूण पाच जण तब्बल 16 तासानंतर हेलिकॉप्टरनं मुन्सियारी इथं सुखरूप उतरले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त पोहोचले मुन्सियारीत : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी रात्री पिथौरागढ जिल्ह्यातील दुर्गम रालम गावात आपल्या मित्रांसोबत रात्र काढली. हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग करावं लागल्यानं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार या गावात अडकले. आज सकाळी हवामान स्वच्छ झाल्यावर राजीव कुमार यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर मुन्सियारी हेलिपॅडवर उतरलं. बुधवारी मिलमच्या दिशेनं जात असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं रालम गावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
ना वीज ना फोन, गावात काढली रात्र : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय कुमार जोगदंडे आणि पीएसओ नवीन कुमार हे देखील होते. बुधवारी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हिमालयात असलेल्या पिथौरागढ जिल्ह्यातील रालम गावात रात्र काढली. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांचं हेलिकॉप्टर मुन्सियारी हेलिपॅडवर उतरलं. हेलिपॅडवर पिथौरागढच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ITBP आणि BRO अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. मुन्सियारी हेलिपॅडवरुन मुख्य निवडणूक आयुक्त आयटीबीपी कॅम्पमध्ये दाखल झाले.
खराब हवामानामुळे मुख्य निवडणूक आयुक्त अडचणीत : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, हिमालयातील खराब हवामानामुळे गोंधळ झाला. त्यामुळे राजीव कुमार यांना रात्री गावात अडकावं लागलं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं रालम गावात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सायंकाळनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं की, "पाऊस पडताच रालममधील किमान तापमान पाच अंशांवर पोहोचते. मुख्य निवडणूक आयुक्तांनाही या अडचणीला तोंड द्यावं लागलं. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांचे सहकारी ज्या ठिकाणी मुक्कामी होते, त्या ठिकाणी वीज आणि फोनची व्यवस्था नव्हती."
मुन्सियारीपासून 30 किमी अंतरावर आहे गाव : हिमालयाच्या उंच भागात बुधवारी खराब हवामान सुरू झाले. संध्याकाळपर्यंत हवामानाचा मूड बदलला. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास रालम आणि इतर हिमालयीन परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. थंडी वाढल्यानं इथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पंचायत समिती सदस्या मंजू देवी यांनी सांगितलं. मुन्सियारी ते रालम हे अंतर 30 किलोमीटर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त रालममध्ये अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
रालम गावात ना वीज, ना फोनची सुविधा : चीन व्याप्त तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या पिथौरागढ जिल्ह्यातील दुर्गम भागात अद्यापही स्थलांतर सुरूच आहे. रालममधील नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागतो. आजही प्रशासन रालम गावाला वीज सेवेनं जोडू शकलेलं नाही. आतापर्यंत याचा फटका फक्त ग्रामस्थांनाच सहन करावा लागत होता, मात्र हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांसह त्यांच्या सहकाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी अंधारात काढली रात्र : रालममध्ये अडकलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह पाचही जणांसाठी गावात रात्र काढणं हा शेवटचा पर्याय होता. कुमाऊं विभागाचे आयुक्त दीपक रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गावात एक घर या पथकासाठी उपलब्ध करुन देण्यात आलं. दरवर्षी एप्रिल ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तीन हजारांहून अधिक नागरिक चीन सीमेजवळ वसलेल्या या गावात स्थलांतर करतात. साडेचार महिने गावकरी रालममध्ये राहतात. याबाबत गावचे माजी प्रमुख ईश्वर नबियाल म्हणतात की, ते चार्जेबल एलईडी दिवे लावून त्यांच्या घरात राहतात.
हेही वाचा :