कोलकाता Justice Abhijit Gangopadhyay : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मंगळवारी 5 मार्चला राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती गंगोपाध्याय यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.
माझा आत्मा मला सांगत आहे : रविवारी न्यायाधीश गंगोपाध्याय म्हणाले की, "माझा आत्मा मला सांगत आहे की, माझा न्यायाधीश म्हणून कार्यकाळ संपलाय. मी कोणत्याही डाव्या पक्ष, काँग्रेस किंवा भाजपामध्ये सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवू शकतो. मी मंगळवारी माझा राजीनामा राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठवणार आहे." यादरम्यान त्यांनी टीएमसीचे आभार मानले. तृणमुलनं त्यांना राजकारणात येण्याचं वारंवार आव्हान दिलं होतं.
राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेणार : न्यायाधीश गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील अनियमिततेच्या आरोपांसह राज्यातील किमान 14 प्रकरणांची केंद्रीय संस्थांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं ते आजवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या निशाण्यावर राहिले आहेत. राजीनामा पाठवल्यानंतर दुपारी मास्टरदा (सूर्य सेन) यांच्या पुतळ्याखाली पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते राजीनाम्याचे कारण आणि भविष्यातील योजना सांगतील, असंही त्यांनी सांगितलं.
न्यायाधीश असताना टिव्हीवर मुलाखत : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिकेवर एका स्थानिक बंगाली टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमुळंही वाद निर्माण झाला होता. यावर सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीश गंगोपाध्याय यांच्यावर कठोर शब्दात टिप्पणी केली होती. विद्यमान न्यायाधीशांना टीव्ही चॅनेलला मुलाखती देण्याचा अधिकार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
आपल्या आदेशामुळं सतत चर्चेत : न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे त्यांच्या आदेशांमुळं चर्चेत आले आहेत. नुकताच 'न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश' हा वाद चर्चेत आला होता. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला 'विशेष बैठक' बोलवावी लागली. गेल्या 9 महिन्यांत, सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या स्वतंत्र आदेशानुसार दोन बैठका बोलवाव्या लागल्या. तर 250 वकिलांनी सरन्यायाधीश टीएस शिवगननम यांना पत्र लिहिल्यानंतर, न्यायाधीश गंगोपाध्याय यांना न्यायालयाच्या खोलीत महाधिवक्ता किशोर दत्त यांची बिनशर्त माफीदेखील मागावी लागली.
हेही वाचा :