नवी दिल्ली Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचं वर्णन भारताचं भविष्य घडवणारा अर्थसंकल्प, असं केलं आहे. अर्थसंकल्पानंतर आपल्या दूरचित्रवाणी भाषणात ते म्हणाले विकसित भारताच्या चार स्तंभांचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आहे. 'भारताचे भविष्य घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प, विकसित भारताच्या सर्व चार स्तंभांना, तरुण, गरीब, महिला शेतकरी फायदेशीर ठरेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
चार स्तंभ सक्षम करणार : हा अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला, शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करेल. हा अर्थसंकल्प देशाचं भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देणारा अर्थसंकल्प आहे. मी अर्थमंत्री निर्मला सीतारामनसह त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, असं मोदींनी म्हटलं आहे.
सर्वसमावेशक विकासावर भर : 'ऐतिहासिक' अर्थसंकल्पात स्टार्ट-अपसाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना 11.11 लाख कोटी रुपयांच्या मोठ्या भांडवली खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात आहे. अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये आर्थिक वाढ, सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला आहे.
कर संकलनात जोरदार वाढ : अर्थमंत्र्यांनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सरकारचा भांडवली खर्च वाढवला आहे, ज्यामुळं वित्तीय तूट GDP च्या 5.1 टक्क्यांवर आली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कर संकलनात जोरदार वाढ झाल्यामुळं हे शक्य झालं आहे. 2024-25 मध्ये हाती घेण्यात येणाऱ्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीची तरतूद 11.1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.1 टक्क्यांनी वाढली आहे.
हे वाचलंत का :