नवी दिल्ली Budget 2024 Expectations : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या थोड्याच वेळात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या धोरणांची अपेक्षा आहे. देशातील विविध क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून या अगोदर अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2024-2025 या वर्षाच्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठ्या अपेक्षा असल्याचं हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुशील गादियान यांनी वृत्तसंस्थेला बोलताना स्पष्ट केलं. तर आयात शुल्कात सवलत मिळावी अशी अपेक्षा व्यावसायिक चेतन सिंग राठौर यांनी व्यक्त केली.
वस्त्रोद्योग क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा - सुशील गादियान : मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुशील गादियान यांनी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "सध्या वस्त्रोद्योग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा श्रमिक उद्योग आहे. शेतीनंतर वस्त्रोद्योग भारतातील सर्वाधिक लोकांना रोजगार देतो. वस्त्रोद्योगाला जास्तीत जास्त दिलासा देणं मोदी सरकारकडून अपेक्षित आहे. सरकारनं वस्त्रोद्योगाकडं लक्ष दिल्यास देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कापड निर्यातीत भारत, चीन, व्हिएतनाम आणि श्रीलंका यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. इथं मजूर, वीज आणि व्याजदर खूप महाग आहे. सरकारी धोरणामुळे आम्ही आमच्या इच्छेनुसार निर्यात करू शकत नाही."
आयात शुल्कात सवलत मिळावी - चेतनसिंग राठौर : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. व्यापारीवर्गही अर्थसंकल्पाची आतुरतेनं वाट पाहत आहे. मोबाईल उपकरणं बनवणाऱ्या आरडी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक चेतन सिंग राठौर यांनी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. चेतनसिंग राठोड म्हणाले की, "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मधून काय देणार आणि काय नाही हे माहीत नाही. मात्र काय यायला हवं ते मी सांगणार आहे. आम्ही संपूर्ण देशाला मोबाईल उपकरणं पुरवतो. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून दोन-चार ब्रँड्स नफा मिळवत आहेत. छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी होत आहे. सरकारनं आयात शुल्कात थोडी सवलत दिली, तर आम्हाला व्यवसाय करणं चांगलं होईल. सरकार आज अर्थसंकल्प मांडणार आहे, तो छोट्या व्यापाऱ्यांच्या हिताचा असेल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. या अर्थसंकल्पात आयात शुल्कात काही सवलत मिळेल," अशी अपेक्षा आहे."
हेही वाचा :
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 : अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलच; तर NEET प्रकरणावरुन विरोधक आक्रमक - Union Budget 2024
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ; कोण आहेत ते केंद्रीय अर्थमंत्री ज्यांनी एकदाही सादर केला नाही अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत मनोरंजक माहिती - Union Budget 2024
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार? पगार किमान 20 हजारानं वाढणार! - 8th Pay Commission