रांची : झारखंडमध्ये देवाप्रमाणे बिरसा मुंडा यांची पूजा केली जाते. बिरसा मुंडा यांची आज 150 वी जयंती आहे. त्यांची जयंती 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरी करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आज विविध कार्यक्रमात सहभागी होऊन बिरसा मुंडा यांना वंदन करणार आहेत.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या नावानं सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. संसद भवन संकुलातील बिरसा मुंडा यांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे. बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर 1875 रोजी तत्कालीन रांची आणि आजच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू गावात आदिवासी कुटुंबात जन्म झाला. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी मुंडा होते. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. इंग्रजांकडून भारतीयांवर आणि भारतीय समाजावर अत्याचार करण्यात होते. हे पाहून त्यांनी शालेय जीवनापासून इंग्रज सरकारविरोधात लढा उभारण्याचा निश्चय केला. इंग्रजांचा जनतेवरील अन्याय सहन न झाल्यानं त्यांनी आयुष्यभर इंग्रजांविरोधात संघर्ष केला. 1894 मध्ये छोटा नागपूर भागात दुष्काळ आणि महामारी आल्यानंतर जनतेचे प्रचंड हाल झाला. अशा काळात बिरसा मुंडा यांनी जनतेची खूप सेवा केली.
दोन वर्षे तुरुंगात- एकीकडं जनतेचा हाल दुसरीकडं इंग्रजांचा जुलूम अशा स्थिती बिरसा यांनी जनतेवरील कर माफीसाठी इंग्रजांविरुद्ध थेट आंदोलन सुरू केले. बिरसांची वाढती लोकप्रियता इंग्रजाच्या डोळ्यात खुपत होती. त्यांनी दडपशाहीचा वापर करून 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात पाठवले. बिरसा मुंडा येथे सुमारे दोन वर्षे बंदिस्त राहिले. 1897 ते 1900 या काळात ब्रिटिश आणि मुंडा यांच्यात युद्धे झाली.
बिरसा मुंडा आणि इंग्रज यांच्यात खुंटी येथे युद्ध- ऑगस्ट 1897 मध्ये, बिरसा मुंडा आणि त्यांच्या सुमारे 400 सहकाऱ्यांनी अत्यंत धैर्य दाखवित धनुष्य-बाणांसह खुंटी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. 1898 मध्ये टांगा नदीच्या काठावर मुंडासंह त्यांचे सहकारी आणि इंग्रज यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. या लढाईत इंग्रज सैन्याचा मानहानीकारक पराभव झाला. परंतु इंग्रजांनी वचपा काढण्याकरिता अनेक आदिवासी नेत्यांना अटक करत कारवाई करण्यास सुरुवात केली. यानंतर 1900 साली डोंबाडी टेकडीवर दुसरे युद्ध झालं. या लढ्यात अनेक महिलांसह निष्पाप अशा लहान मुलांचा मृत्यू झाला.
रांचीमध्ये घेतला अखेरचा श्वास-बिरसा मुंडा यांनी युद्ध करून इंग्रजांना जेरीस आणलं होतं. त्यामुळे फेब्रुवारी 1900 मध्ये इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक करून रांची तुरुंगात डांबले. येथेच 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाल्याचं इंग्रज सरकारनं सांगितलं. मात्र, त्यावेळी कॉलराची कोणतीही लक्षणे दिसली नसल्याचां अनेकांचे म्हणणे आहे. वयाच्या 25 व्या वर्षे मुंडा यांचा मृत्यू झाला.
'बिरसैत' जपतात बिरसा मुंडा यांची विचारसरणी-भगवान बिरसा मुंडा यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्याला 'बिरसाईच' म्हणतात. आजही त्यांचे अनुयायी त्यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणं चालतात. बिरसा मुंडा यांनी संपूर्ण जीवन आदिवासी समाजाच्या विकासाकरिता वाहून घेतले होते. अत्याराचाविरोधात आक्रमपणे लढा देताना त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बिगुल फुंकला होता. बिरसा मुंडा हे पुरोगामी विचारवंत आणि सुधारणावादी नेते होते. त्यांनी आदिवासी समाजाला अंधश्रद्धा आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात जागरूक केले. प्राण्यांना मारणे योग्य नाही, त्यांचा बळी देणे चुकीचे आहे, असे त्यांचे मत होते. पशू-पक्षी यांच्याबाबत सहानुभूती असली पाहिजे, असे सांगून त्यांनी आदिवासींना दारू पिण्यास विरोध केला. बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या संघटनावर भर दिला.
- झारखंड व्यतिरिक्त बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी भागातही बिरसा मुंडा यांची पूजा केली जाते. रांची येथील कोकर येथे बिरसा मुंडा यांची समाधी आहे. दरवर्षी अनेक बिरसाईच लोक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात.
कशामुळे मुंडा ठरले लोकप्रिय
1. मुंडावाद: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, बिरसा मुंडा यांनी 'मुंडावाद' किंवा "किसांगवाद" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन धार्मिक चळवळीची स्थापना केली. पारंपारिक मुंडा रीतिरिवाज आणि श्रद्धा पुनरुज्जीवित करणे आणि मुंडा लोकांना त्यांच्या अत्याचारी लोकांविरुद्ध एकत्र करणे, हा उद्देश होता.
2. ब्रिटिश सरकारला विरोध : बिरसांच्या विचारसरणीमध्ये स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि दडपशाहीविरुद्ध प्रतिकार या महत्त्वावर भर देण्यात आला. मुंडा लोकांनी त्यांच्या पारंपारिक मूल्यांचा स्वीकार करावा, ब्रिटीश वसाहतवाद आणि हिंदू जमीनदारांचा प्रभाव नाकारला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
आदिवासी गौरव दिवस होतो साजरा
आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारनं 2021 मध्ये आदिवासी गौरव दिवस अथवा जनजातीय दिवस घोषित केला. आदिवासी समुदायांचे अमूल्य योगदानाची ओळख होण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो. या वर्षी चौथा आदिवासी गौरव दिन देशभरात साजरा केला जात आहे. आदिवासी समुदायांनी क्रांतिकारी चळवळीतून इंग्रजाशी संघर्ष करताना सर्वोच्च बलिदान दिले. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध देशातील अनेक आदिवासी चळवळी राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या होत्या. त्यांनी देशभरातील भारतीयांना प्रेरित केले, असे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सोशल मीडियात पोस्टमध्ये म्हटलं आहे.