मुझफ्फरपूर Air Force helicopter crashes : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीत पाण्यात उतरवण्यात आलं आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं या हेलिकॉप्टरच्या पायलटनं हे हेलिकॉप्टर चक्क पाण्यात उतरवलं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले हवाई दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे हेलिकॉप्टर पाण्यात उतरावं लागलं. यातील पायलट आणि जखमी सैनिकांना उपचारासाठी एसकेएमसीएचमध्ये नेण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव प्रत्याया अमृत यांनी अशी घटना घडल्याचं माध्यमांना सांगितलं.
मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग : बिहारमधील पुरामुळे 29 जिल्हे अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत. बिहारमध्ये कोसी, गंडक, कमला बालन यांसारख्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी या नद्यांना पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी सखल भागातील लाखो लोक आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. मात्र या पुरात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी तसंच मदत करण्यासाठी हवाई दलाची टीम कालपासून अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी आली होती. दरम्यान, हेलिकॉप्टरचं इंजिन निकामी झाल्यानं हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग करावं लागलं.
एसडीआरएफच्या टीमने केला बचाव : बिहारमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. अजूनही अनेक भागात लोक अडकले आहेत. अशा लोकांपर्यंत अन्न आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी हवाई दलाची टीम मदत करत होती. मात्र मुझफ्फरपूरमध्ये हवाईदलाचं हेलिकॉप्टर बिघडल्यानं पाण्यात उतरवण्यात आलं. स्थानिक पाणबुडे आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केलं. हवाई दलाचा पायलट जखमी झाला असला तरी तो धोक्याच्या बाहेर आहे, असं सांगण्यात आलं.
हेही वाचा.