पटना Nitish Kumar Met Governor : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. या दोघांमध्ये येथील राजभवनात सुमारे 40 मिनीटं चर्चा झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय मंत्री विजयकुमार चौधरीही उपस्थित होते. ही बैठक का झाली हे स्पष्ट झालं नाही. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यावर अधिकृत अशी बातमी नाही. त्यांच्याकडे आघाडीचं नेतृत्व न दिल्याने ते नाराज आहेत अशीही चर्चा आहे. त्यामुळे ते पुन्हा एनडीएसोबत जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जातेय.
सरकारी कार्यक्रमानंतर नितीश कुमार थेट राजभवनात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत कार्यक्रम आटोपल्यानंतर नितीश कुमार थेट राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. सुभाषचंद्र बोस यांच्यावर आयोजीत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. परंतु, राज्यपालांकडे जाताना नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नव्हते. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलय.
बिहारमध्ये राजकीय खळबळ होऊ शकते का : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा आहे. इंडिया आघाडीत समन्वयक न केल्याने संतापलेले नितीशकुमार केव्हाही बाजू बदलू शकतात असा अंदाज लावला जातोय. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत संकेत दिले होते. नितीश कुमार यांना यायचे असेल तर विचार केला जाईल, असंही शाह म्हणाले होते.
सातव्यांदा घेतली होती शपथ : नितीश कुमार यांनी भाजपावर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत स्वत: मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी शपथ घेतली.
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
- नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. परंतु, बहुमताची जमवाजमव करता न आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
- दुसऱ्यांदा नितीश कुमारांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- तिसऱ्यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- चौथ्यांदा नितीश कुमार यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले.
- पाचव्यांदा पुन्हा 20 नोव्हेंबर 2015 साली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- सहाव्या वेळी आरजेडी सोबत आघाडी तुटल्यानंतर एनडीएच्या नेतृत्वात नितीश कुमार यांनी पुन्हा 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- नितीश कुमार यांनी 10 ऑगस्ट 2022 रोजी आरजेडीसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हेही वाचा :
1 आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून चौकशी, कथित 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप
2 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज!
3 जयललिता यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता पुन्हा चर्चेत, बंगळुरू कोर्टानं कर्नाटकला 'हे' दिले आदेश