नवी दिल्ली/गाझियाबाद Farmers Protest 2024 : दिल्लीकडे कूच करण्यासाठी 13 फेब्रुवारीपासून शेतकरी शंभू सीमेवर बसले आहेत. मात्र, अद्यापही भारतीय किसान युनियननं आंदोलनात सहभागी होण्याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. असं असतानाच आता संयुक्त किसान मोर्चानं 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. तर 17 जानेवारीला सिसौली येथे होणाऱ्या बीकेयूच्या बैठकीत राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारत बंदची पूर्ण तयारी : भारतीय किसान युनियनचे युवा प्रदेशाध्यक्ष अनुज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय किसान युनियननं 16 फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या हाकेची संपूर्ण तयारी केली आहे. भारत बंद यशस्वी करण्यासाठी कर्मचारी संघटना, कामगार संघटना, जुनी पेन्शन संघर्ष समिती, रेडी-रेल्वे कामगारांच्या संघटना, टेम्पो, ट्रान्सपोर्ट युनियन सहभागी होणार आहेत. भारत बंद यशस्वी करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा अंतर्गत शेतकरी संघटना ग्रामीण भागात जाऊन सर्वांशी संवाद साधत आहेत." तसंच एसकेएमच्या आवाहनाची अंमलबजावणी शांततेत केली जाईल, असंही ते म्हणाले.
17 फेब्रुवारीला पार पडणार महत्वाची बैठक : पुढं ते म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यांना दिल्लीत जाऊन आपल्या मागण्या सरकारसमोर मांडायच्या आहेत. तसंच 17 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील सिसौली येथे शेतकऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये भारतीय किसान युनियनच्या राष्ट्रीय स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. सर्व शेतकरी नेत्यांना या बैठकीकरिता सिसौली येथे बोलावण्यात आलं आहे. बैठकीत संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय किसान युनियन सध्याच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि सहकार्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात", अशी माहिती अनुज सिंह यांनी दिली.
हेही वाचा -