नवी दिल्ली : Shaheed diwas 2024 : 23 मार्च 1931 रोजी भारताच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशीचा दोरखंड आनंदाने गळ्यात घेऊन प्राणांची आहुती दिली होती. या वीरांचे हौतात्म्य आणि बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. भारत ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त व्हावा आणि संपूर्ण समाजाचे मुलभूत परवर्तन होऊन समतेवर आधारित राज्याची स्थापना व्हावी या एकाच उद्देशानं या तिघांनीही बलिदान देणं पत्करले. त्यावेळी ब्रिटीशांच्या विरोधात सुरू असलेल्या स्वातंत्रय चळवळीचं दिल्ली हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. या तिन्ही हुतात्म्यांच्या अनेक आठवणी दिल्लीशी निगडित आहेत. मुख्य आठवण म्हणजे त्यांचा दिल्ली विद्यापीठाशी खूप जवळचा संबंध होता.
या तिन्ही शहीदांचा दिल्ली विद्यापीठाशी खूप खोल संबंध होता हे खूप कमी लोकांना माहीत असेल. जेव्हा या तरुणांनी ब्रिटीश राजवटीच्या निषेधार्थ दिल्लीतील नॅशनल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले होते, तेव्हा या संबंधीचा खटला सुरू असताना त्यांना दिल्ली विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरू कार्यालयाच्या खाली असलेल्या तळघरात (तत्कालीन व्हॉईसरॉयचे निवासस्थान) अनेक दिवस तुरुंगात ठेवले होते.
दिल्ली विद्यापीठाने या तळघराला शहीद भगतसिंग स्मारक असे नाव दिले आहे. यामध्ये भगतसिंग यांना तुरुंगवासात झोपण्यासाठी दिलेली खाट, भगतसिंग यांचा कंदील आणि पाण्याच्या भांड्यासह अनेक गोष्टी स्मृतिचिन्हे म्हणून जपून ठेवण्यात आल्या आहेत.
अभ्यासकांच्या मते, ब्रिटीशांनी तिघांनाही तुरुंगात टाकण्यापूर्वी भगतसिंग 1923 मध्ये दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकार म्हणून आले होते. त्या दिवसांत ते गणेश शंकर विद्यार्थी संपादित करत असलेल्या प्रताप या वर्तमानपत्राचे वार्तांकन करायचे. अनेक लेख आणि पुस्तकांमध्ये याबाबतचा उल्लेख आहे.
पत्रकार म्हणून कव्हरेज करण्यासाठी दिल्लीत फिरत असताना, काश्मिरी गेट येथे असलेल्या तत्कालीन प्रसिद्ध रामनाथ स्टुडिओमध्ये क्लिक केलेला त्याचा फोटोही मिळाला आहे. टोपी घातलेला हा तोच फोटो आहे ज्याला आपण भगतसिंगची ओळख म्हणून सगळीकडे दिसतो.
दिल्ली विद्यापीठात दरवर्षी शहीद दिनानिमित्त हा कक्ष उघडला जातो आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर योगेश सिंग यांनी तिन्ही शहीद जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
या दिवशी हा कक्ष दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीही खुला असतो. प्रोफेसर पी सी जोशी हे दिल्ली विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू होते. त्यांनी २०२१ मध्ये या कक्षाचे नूतनीकरण केले आणि त्याला भगतसिंग स्मारक असे नाव दिले. तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते.
हेही वाचा -