नवी दिल्ली SC Rejects Baba Ramdev Apology : सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी न्यायालयात हजर झाल्यानंतर बाबा रामदेव यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात वापरलेल्या भाषेवरुन न्यायालयानं चांगलचं फटकारलं. बाबा रामदेव यांनी सादर केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं अमान्य केला. त्यांना आठवडाभरात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची शेवटची संधी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.
पतंजलीची दिशाभूल करणारी जाहिरात : सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवला. सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना चांगलंच फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही पतंजलीकडून दिशाभूल करणारे दावे करण्यात आले. मात्र केंद्र सरकारनं कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पतंजलीच्या कृत्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सहभागी असल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं ताशेरे ओढले.
बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना फटकारलं : पतंजली संस्थेकडून दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र सरकारनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठानं बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या वकिलांना चांगलंच धारेवर धरलं. "तुम्ही काहीही लिहून पळून जाऊ शकत नाही. अयोग्य प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण या दोघांनीही माफी मागायला हवी होती," असं खंडपीठानं यावेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना फटकारलं.
न्यायालयानं फेटाळला माफीनामा : दिशाभूल जाहिरात केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशननं याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी माफीनामा सादर केला. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांनी सादर केलेला माफीनामा अमान्य केला. यावेळी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठानं "हा अवमान गांभीर्यानं घ्यावा. तुम्ही कराराचं उल्लघन केलं आहे. त्यामुळे हा माफीनामा स्वीकारण्यास आम्ही तयार नाही," असं स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Patanjali False Advertising case : पतंजली जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली योगगुरू बाबा रामदेव यांना नोटीस
- प्रभू श्रीरामावर टीका केल्यास विरोधी पक्षांना राजकीय मोक्ष मिळणार - रामदेव बाबा
- Baba Ramdev : पवार काका-पुतणे महाराष्ट्राच्या राजकारणात शुभ आणि मंगल; रामदेव बाबांची मिश्किल प्रतिक्रिया