अयोध्या Ayodhya Ramlala Precious Gift : अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरातील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला पार पडला. रामलल्लांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी होत असून जगभरातील राम भक्तांकडून रामलल्लांसाठी अनेक विशेष आणि मौल्यवान भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे 11 कोटी रुपये किमतीचा हिऱ्यांनी बनलेला मुकुट आहे. हा मुकुट रामलल्लांच्या मस्तकावर सजण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, रामलल्लांला दागिने आणि कपडे घालून सजवण्यासाठी पुजाऱ्यांना वेळच मिळत नाही.
सुरतच्या हिरे व्यापाऱ्याने दिली होती खास भेट : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या अगोदर आणि त्यानंतरही राम मंदिराला भेटवस्तू मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रामलल्लासाठी खास वस्त्र आणि दागिन्यांचा अक्षरश: ढीग लागलाय. हे सर्व दागिने आणि वस्त्र रामलल्लाल समर्पित करणं शक्य नाही. सुरतचे हिरे व्यापारी आणि ग्रीनलॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी रामलल्लांसाठी हिरे, सोने आणि चांदीने जडलेला मुकुट मंदिराच्या विश्वस्तांना दिला आहे. सहा किलो वजनाच्या या मुकुटात साडेचार किलो सोने वापरण्यात आलं आहे. लहान आणि मोठ्या आकाराचे हिरे, माणिक, मोती आणि नीलम रत्नेही या मुकुटात जडवण्यात आली आहेत. मात्र, 11 कोटी रुपयांचा हा मुकुट रामलल्लांच्या डोक्यावर बघण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी : दररोज दर्शनासाठी येणारे भाविक त्यांच्या क्षमतेनुसार मोठ्या प्रमाणात रामलल्लांसाठी भेटवस्तू देत आहेत. लाखो भाविक राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, अयोध्येतील सर्व प्रवेश मार्गांवरून चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे. रेल्वे रुळ दुहेरीकरणामुळे अजूनही नियमित गाड्या सुरू झालेल्या नाहीत. असं असतानाही हवाई वाहतूक आणि वाहतूक सेवेद्वारे भाविक मोठ्या संख्येनं अयोध्येला पोहोचत आहेत. येत्या आठवडाभरात रेल्वे आणि बस वाहतूक सुरळीत सुरू झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -