जैसलमेर/राजस्थान : Tejas crashes in Jaisalmer : भारतीय हवाई दलाचं लढाऊ तेजस हे विमान (LCA) आज राजस्थानमधील जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान जैसलमेरजवळ क्रॅश झालं. प्रसंगावधान राखून पायलट सुरक्षितपणे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन्ही पायलट सुरक्षित : तेजस हे विमान जैसलमेर येथील लक्ष्मीचंद सावल कॉलनीजवळ क्रॅश झालं. ते पुढे मेघवाल हॉस्टेल इमारतीजवळ जाऊन पडलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (Tejas Crashes In Jaisalmer) अपघातानंतर पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत दोन्ही पायलट सुखरूप बचावले आहेत. याचवेळी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ तेथे दाखल झाल्या.
कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश : तेजस विमान अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही. त्याबाबतचा शोध घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये सैन्याच्या तीनही शाखा युद्ध सरावात सहभागी होत आहेत. हा युद्ध सराव पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील पोखरणला पोहोचले आहेत.