अमरावती AP Govt Tribute To Ramoji Rao : आंध्र प्रदेश सरकारनं आज 'पद्मविभूषण' रामोजी राव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिवादन सभेचं आयोजन केलं आहे. रामोजी राव यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम हा राज्यस्तरीय असल्याचं जाहीर करणारं निवेदन आंध्रप्रदेश सरकारनं दिलं आहे. राज्याचा कार्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या अभिवादन सभेसाठी 5 मंत्री आणि 12 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
आंध्रप्रदेश सरकारमधील 5 मंत्री आणि अधिकाऱ्यांची समिती : आंध्रप्रदेश सरकारनं दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना अभिवादन करण्यासाठी स्मृती सभेचं आयोजन केलं आहे. या आयोजन समितीत पाच मंत्री आणि 12 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंत्र्यांच्या समितीत के पार्थ सारथी, नंदेदला मनोहर, सत्य कुमार, कोल्लू रवींद्र आणि निम्मला रामनायडू यांचा समावेश आहे. तर सीआरडीए आयुक्त कटमा भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विजयवाड्यातील कानुरू इथं या अभिवादन सभेचं आयोजन करण्यात येणार असून मंत्र्यांच्या समितीनं त्याबाबतचा आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित : कानुरू इथं 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्मरण सभेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मंत्री, रामोजी राव यांचे कुटुंबीय, केंद्रीय मंत्री, एडिटर्स गिल्डचे पदाधिकारी आणि देशातील प्रमुख पत्रकारांसह तब्बल 7 हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. यासह चित्रपट जगतातील अनेक कलावंत या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. समितीनं दिलेल्या माहितीनुसार, कलाविश्वातील अनेक मान्यवर, पत्रकार आणि शेतकरी प्रतिनिधीही या अभिवादन सभेत सहभागी होणार आहेत. येणाऱ्या कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पासही देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा एकूण कार्यक्रम होणार आहे.
अभिवादन सभेत दाखवणार लघुपट : दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना अभिवादन करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं स्मृती सभेचं आयोजन केलं. या सभेला येणाऱ्या मान्यवरांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी मंत्र्यांची समिती आणि अधिकारी दक्षता घेणार आहेत. या अभिवादन सभेत रामोजी राव यांच्या जीवनाशी निगडीत लघुपट दाखवण्यात येणार आहे. सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी खास दालनांची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री पार्थ सारथी यांनी दिली.
हेही वाचा :
- मुंबई, संभाजीनगरासह राज्यात ठिकठिकाणी रामोजी राव यांना श्रद्धांजली; तर नागपुरात जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी आदरांजलीच्या प्रसादासाठी केला हलवा - Tribute to Ramoji Rao
- माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण; भावी पिढ्यांना मिळणार प्रेरणा - Ramoji Rao statue unveiled
- 'रामोजी ग्रुपचं विजयपथावरील मार्गक्रमण निरंतर सुरूच राहील': इच्छापत्रातून कर्मचाऱ्यांना रामोजी राव यांची भावनिक साद, सोपवली जबाबदारी - Ramoji Rao letter