आग्रा Agra Car Accident : लग्नावरुन परतणाऱ्या वऱ्हाडाची कार कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आग्रा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा घडली. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार शेजारच्या कालव्यात पडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघातानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळाची पाहणी करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. त्यानंतर सर्वांना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केलं. दोन जणांवर उपचार सुरू आहेत. मनिष (32), शैलेंद्र उर्फ पिंकी (30), जितेंद्र (32) आणि विनोद कुमार (42) अशी मृतांची नावं आहेत.
कारचालकाचं नियंत्रण सुटलं : यामध्ये योगेशची प्रकृतीही गंभीर आहे. तर, आदित्यची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व लोकं शमसाबादच्या गढी मोहनलाल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेबद्दलची माहिती पोलिसांनी संबंधित कुटुंबांना दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आपल्या घरातले व्यक्ती गेल्यानं सर्वांनीच हंबरडा फोडला. कारमधील सर्व प्रवासी लग्न समारंभातून परतत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मृतांमध्ये सर्वांचं वय 40 ते 45 वर्ष आहे. त्यामुळे आपल्या घरातील तरुण व्यक्ती गेल्याचं दु:ख नातेवाईकांमध्ये दिसून आलं.
मृत्यूपूर्वी संघर्ष : कारमध्ये अडकलेला तरुण स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आतमध्ये पाणी भरल्यानं तो काही मिनिटांतच बेशुद्ध झाला. तसंच, मोठ्या प्रमाणात थंडी असल्यानं पाण्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. गाडीचा वेग मोठ्या प्रमाणात असल्यानं गाडीवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला अपयश आलं. यामध्ये कार कालव्यामध्ये कोसळली. दरम्यान, मदतीसाठी अनेक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. परंतु, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
1 आरक्षण घेऊनच येणार! आंदोलक मनोज जरांगे पाटील निघणार मुंबईकडं
2 थराराक! ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं बारा वाहनांना उडवलं, विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू
3 शरद मोहोळ खून प्रकरण; मुख्य आरोपीनं जिथं पसरवली दहशत, तिथंच काढली पेलिसांनी धिंड