अग्निवीरांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; सीआयएसएफ बीएसएफमध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट - Agniveer Reservation - AGNIVEER RESERVATION
Agniveer : अग्निवीर योजनेवरून सरकावर टीका होत असताना केंद्र सरकारनं योजनेत काही बदल केले आहेत. माजी अग्निवीरांना सीआयएसएफ, बीएसएफमधील कॉन्स्टेबल पदांच्या भरतीमध्ये शारीरिक चाचणी आणि वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. त्याचबरोबर 10 टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.


Published : Jul 12, 2024, 9:44 AM IST
Agniveer Reservation : केंद्र सरकारकडून माजी अग्निवीर जवानांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारनं माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतही सूट देण्याची घोषणा गृह मंत्रालयाकडून गुरुवारी करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयानुसार सीआयएसएफ, बीएसएफमधील कॉन्स्टेबल पदांच्या भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे राखीव ठेवण्यात येतील.
सैन्य दलात शिस्त येईल : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक नीना सिंह म्हणाले, "केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे माजी अग्निवीर तरुणांसाठी राखीव असणार आहेत. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेतही सूट दिली जाणार आहे. या निर्णयाचा सीआयएसएफसाठीदेखील फायदाच होणार आहे. कारण सीआयएसएफला प्रशिक्षित, सक्षम आणि तरुणांची गरज असते. यामुळं सैन्य दलात शिस्त येईल. या अग्निवीरांना वयोमर्यादेबरोबरच शारीरिक क्षमता परीक्षेतदेखील सूट दिली जाणार आहे."
पहिल्या पाच वर्षासाठी सवलत- बीएसएफचे पोलीस महासंचालक नितीन अग्रवाल म्हणाले, "अग्निवीर योजनेतून सैनिकांना 4 वर्षांचा अनुभव मिळणार आहे. त्यांना पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित करण्यात आलं आहे. बीएसएफसाठी हे खूप चांगलं आहे. प्रशिक्षणानंतर निवडक अग्निवीर जवानांना सीमेवर तैनात केलं जाईल. आम्ही त्यांची भरती करण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहोत. भविष्यात कॉन्स्टेबलच्या सर्व भरतींमध्ये 10 टक्के नोकऱ्या माजी अग्निवीर जवानांसाठी राखीव ठेवल्या जातील. त्यांना कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. वयातही सवलत दिली जाईल. पहिल्या बॅचसाठी वयाची सवलत 5 वर्षांसाठी असेल. परंतु त्यानंतरच्या बॅचसाठी ही सवलत फक्त 3 वर्षांसाठी असणार आहे," असं नितीन अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
2022 मध्ये अग्निवीर योजना सुरू : केंद्र सरकारनं 2022 मध्ये अग्निवीर योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत सैन्यदल, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी युवकांची भरती केली जाते. 4 वर्षात सहा महिन्यांचं प्रशिक्षण युवकांना दिलं जाते. चार वर्षांनंतर अग्निवीरांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे मानांकन देण्यात येणार आहे. या गुणवत्तेच्या आधारे 25% अग्निवीरांना सेवेत कायम घेतलं जातं.
हेही वाचा