नवी दिल्ली BHARAT RATNA : माजी उपपंतप्रधान तथा भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रविवारी (३१) 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अडवाणी यांच्या घरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजनाथ सिंह यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचं अभिनंदन केलं.
भारताला घडवण्यात महत्वाची भूमिका : "लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांचं अभिनंदन केलंय. ते आमच्या काळातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक आहेत. भारताच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. अडवाणींसोबत अनेक दशके काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करताना पाहणं खूप खास होतं. हा सन्मान म्हणजे त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या अखंड योगदानाची ओळख आहे. लोकसेवेसाठी त्यांचं समर्पण तसंच आधुनिक भारताला घडवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे'. दरम्यान, शनिवारी (ता. 30) राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर तसंच एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून भारतरत्न पुरस्कार स्वीकारला. मात्र सध्या लालकृष्ण अडवाणींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळं त्यांना घरी जाऊन भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काय म्हणाले होते अडवाणी : भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, "आज मला देण्यात आलेला 'भारतरत्न' मी अत्यंत नम्रतेनं आणि कृतज्ञतेने स्वीकारतो. हा केवळ एक व्यक्ती म्हणून मला दिलेला सन्मान नसून माझ्या आदर्शाचाही सन्मान आहे. मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे,".
हे वाचलंत का :
- केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षड्यंत्र; सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप - Lok Sabha Elections
- अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन! खैरेंना शुभेच्छा देत दानवेंची प्रचाराला सुरुवात करण्याची घोषणा - Sambhajinagar Lok Sabha Election
- MLA Ashish Shelar : नैसर्गिक युती या शब्दाला भ्रष्ट म्हणणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, आशिष शेलारांचा हल्लाबोल - Shelar criticizes Uddhav Thackeray