नवी दिल्ली Stage Collapse During Jagran : मंदिरात सुरू असलेल्या जागरणाच्या कार्यक्रमात स्टेज कोसळून मोठा अपगात झाला. या अपघातानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर, तब्बल 15 भाविक जखमी झाले. ही घटना दिल्लीच्या कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
कालकाजी मंदिरात स्टेज कोसळला : दिल्लीच्या कालका मंदिरात शनिवारी जागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. मात्र रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास स्टेज कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातानंतर मंदिरातील भाविकांनी एकच धावपळ केली. त्यामुळं झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. तर चेंगराचेंगरीत तब्बल 15 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
स्टेज कोसळून झाला अपघात : शनिवारी रात्री कालका मंदिर परिसरात जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यानंतर स्टेजच्या जवळ भाविकांनी मोठी गर्दी केली. तब्बल 1500 ते 1600 भाविक या ठिकाणी जमले होते. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी ही गर्दी अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीवर नियंत्रण करण्यात त्यांना यश आलं नाही. भाविकांनी मंदिर प्रशासन आणि पोलिसांना न जुमानता स्टेजवर गर्दी केली. मंदिर प्रशासनानं बनवलेला स्टेज हा लाकडी आणि लोखंडी पट्ट्या वापरुन बनवण्यात आला होता. मोठी गर्दी झाल्यानं हा स्टेज झुकल्यानं खाली कोसळला. त्यानंतर मोठी झुंबड उडून चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जागरणासाठी घेतली नाही परवानगी : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालकाजी मंदिरात आयोजित जागरणाच्या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळं अपघात झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या जागरणाच्या कार्यक्रमात भजन गाणाऱ्या बी प्राक यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. "व्यवस्थापन योग्य असणं गरजेचं आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कालकाजी मंदिराच्या परिसरात 26 वर्षांपासून जागरणाचं आयोजन करण्यात येते. हा जागरणाचा कार्यक्रम खासगी असल्यानं त्याला परवानगी देण्यात आली नाही. रात्री घटना घडली तेव्हा, पोलीस अधिकारी राजेश हे देखील तिथं उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :