राममंदिराचे द्वार बंद परंतु विधिवत पूजा
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात आज रामनवमीची विधिवत पूजा केली जात आहे. भव्य शोभायात्रेसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. भाविकांना प्रवेश नसल्याने फक्त मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात येत आहे. रामनवमीच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरात रामजन्मोत्सवानिमीत्त विद्युत रोषणाई आणि भव्य श्रीराम शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. मागील 50 वर्षांपासून ही परंपरा भाविक उत्साहाने पाळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागोपाठ दुसऱ्या वर्षीही शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. आज रामनवमीच्या दिवशी प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत, सकाळपासून पूजा अर्चना केली जात आहे. पुजाऱ्यांकडून भगवान शंकराच्या पिंडीसह प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची विधिवत पूजा केली जात आहे. आज सकाळी प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचे शृंगार केल्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिराचे पट उघडे केले. दुपारी बारा वाजता मंदिरात पुजाऱ्यांद्वारे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कोणत्याही भाविकाला प्रवेश बंद आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी पूजेचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमांद्वारे करण्याची व्यवस्था केली आहे.